कोकणातून समुद्रात जाणारं पाणी मराठवाड्यात वळवणार, बबनराव लोणीकरांचा निर्धार
कोकणातील नार-पार, दमनगंगा, उल्हास, वैतरणा खोऱ्यालगत असलेल्या मराठवाड्यातील गोदावरी नदीत वळवता येणार आहे. त्यामुळे तहानलेल्या दुष्काळग्रस्त मराठवाड्याला हा मोठा दिलासा मिळणार आहे.
जालना : कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र हे पावसाचे पाणी समुद्राद्वारे वाहून जाते. तर दुसरीकडे मराठवाड्यात पाऊस नसल्याने दुष्काळ पडला आहे. त्यामुळे कोकणातून (Konkan) समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात आणणार असल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी दिली आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी (Marathwada) कोकणातून पाणी वळवण्याच्या योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinate Meeting) नुकतीच मान्यता देण्यात आली होती.
मराठवाड्यात पाण्याची नैसर्गिक उपलब्धता कमी आहे. त्यामुळे कोकणातील अतिरिक्त किंवा वाया जाणारे पाणी मराठवाड्यात वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कोकणातील एकूण 23 टीएमसी पाणी मराठवाड्यात आणले जाणार आहे. तसेच उजनी धरणातून किंवा पश्चिम महाराष्ट्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या माध्यमातून मराठवाड्यात आणण्याचा प्रस्तावाला मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे कोकणता वाहून जाणारे पाणी हे मराठवाड्यातील तुटीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचा निर्णय मंजूर झाला आहे, अशी माहिती बबनराव लोणीकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.
“नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रिसूत्री कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यामातून मराठवाड्याकडे पाणी वळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामुळे मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त करण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे,” असेही लोणीकर म्हणाले.
“कोकणात पाणी वळवण्याच्या निर्णयामुळे मराठवाड्यातील सर्व धरणं बाराही महिने भरलेली राहतील. त्यामुळे मराठवाड्यात शेती, उद्योगधंदे यांना चालना मिळेल. त्याशिवाय याच माध्यमातून मराठवाड्यातील 11 धरणं जोडणार असून यामुळे सर्व तलाव कायमची भरलेली राहितील,” अशीही माहिती त्यांनी दिली.
“मराठवाड्यात सातत्यानं दुष्काळ पडत आहे. त्यामुळे मराठवाड्यातल्या जनतेला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान कोकणातून मराठवाड्यात पाणी वळवण्यासाठी एकूण 70 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे,” असेही लोणीकर यावेळी म्हणाले.
कोकणातील नार-पार, दमनगंगा, उल्हास, वैतरणा खोऱ्यालगत असलेल्या मराठवाड्यातील गोदावरी नदीत वळवता येणार आहे. त्यामुळे तहानलेल्या दुष्काळग्रस्त मराठवाड्याला हा मोठा दिलासा मिळणार आहे.