मुंबई : लखीमपूर हिंसाचार प्रकरणावरुन महाविकास आघाडी सरकारकडून 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्याबाबत घोषणा केली होती. मात्र, या बंदमध्ये शिवसेना सहभागी होणार की नाही? असा सवाल विचारला जात होता. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली. (Shivsena will participate in the Maharashtra Bandh on October 11, Clear from MP Sanjay Raut)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बालासाहेब थोरात हे चिपी विमानतळाच्या कार्याक्रमात होते. त्यांनी सिंधुदुर्गातून फोन करुन आम्हाला एकत्र पत्रकार परिषद घ्यायला सांगितली. 11 तारखेला महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ खासकरुन लखीमपूर येथे जो निर्घृण आणि अमानुष असा प्रकार शेतकऱ्यांबाबत घडला त्याचा निषेध करण्यासाठी बंद पुकारला आहे. त्याबंदला महाविकास आघाडीचे तीनही घटकपक्ष सक्रीय पाठींबा देत आहेत, असं संजय राऊत यांनी जाहीर केलंय.
शिवसेना या बंदमध्ये पूर्ण ताकदीने उतरणार आहे. देशाची पूर्ण परिस्थिती आपल्या माहिती आहे. प्रश्न अनेक असले, प्रश्न इतके आहेत की प्रत्येक पक्षाला बंद व्हायला हवा. बंद असल्याने लोकांची गैरसोय होईल. लखीमपूर भागात जे घडलं ते सरळसरळ या देशाच्या संविधानाची हत्या आहे. कायद्याची पायमल्ली आहे. जो अन्नदाता शेतकरी त्याला खतम करण्याचं षडयंत्र आहे. या सरकारने मनात आणलं तर राज्या-राज्यात लखीमपूर सारख्या घटना घडू शकतात. केंद्र सरकार आणि संबंधित पक्षाच्या नसानसात अमानुषता आणि निर्घृणता भरलं आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. याची सुरुवात महाराष्ट्रातून व्हावं यासाठी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिल्याचं राऊत म्हणाले.
राहुल गांधी यांच्यासोबतही याबाबत चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या पाठोपाठ इतर राज्यांनीही पुढाघार घ्यावा असं म्हटलं. शेतकऱ्यांचा समर्थनार्थ जिथे आहोत तिथे पाठींबा द्यावा. त्याशिवाय या निर्घृण कृतीला आळा बसणार नाही. जनता झोपलेली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही प्रमुख पक्षांबरोबर शिवसेनाही पूर्ण ताकदीने या बंदात उतरले. पण ताकद लावण्याची गरज नाही. लोकं स्वयंस्पूर्तीने बंद पाळतील. कारण लखीमपूरच्या घटनेची जखम देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात झालं आहे. चार शेतकऱ्यांचा खून करुनसुद्धा केंद्रीय मंत्र्यांचा नेता मोकाट फिरतोय हे जनतेने पाहिलं, असा घणाघातही राऊत यांनी यावेळी केलाय.
नवाब मलिक यांनीही भाजपवर जोरदार टीका केलीय. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलानं शेतकऱ्यांवर गाडी चढवली. त्यात शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. इतका नरसंहार झाल्यानंतरही गुन्हा दाखल व्हायला उशीर झाला. पवारसाहेब जसे म्हणाले जालियनवाला बागसारखं हत्याकांड आहे. भाजप हे शेतकऱ्यांच्या शेतमालाची लूट करणारा पक्ष आहे. शेतकऱ्यांची हत्या करणारा हा पक्ष आहे. त्यांना आळा घालणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात बैठक झाली. त्यात ठरलं की शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, असंही नवाब मलिक म्हणाले.
इतर बातम्या :
पार्थ पवार ड्रग्ज पार्टीत होते का? सोडलेल्या 6 जणांची नावं काय? समीर वानखेडे म्हणाले
Shivsena will participate in the Maharashtra Bandh on October 11, Clear from MP Sanjay Raut