लातूर जिल्ह्यात MIM ला भगदाड, जिल्हाध्यक्षांसह 5 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार
लातूर जिल्ह्यातली मोठी नगरपालिका असलेल्या उदगीर पालिकेतील एमआयएमचे पाच नगरसेवक आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. या प्रवेशाने उदगीर नगरपालिकेचं राजकारण ढवळून निघालं आहे. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक ताहेर सय्यद यांच्यासह पाच नगरसेवक आपल्या समर्थकांसह मुंबईकडे रवाना झाले आहेत.

लातूर : लातूर जिल्ह्यातली मोठी नगरपालिका असलेल्या उदगीर पालिकेतील एमआयएमचे पाच नगरसेवक आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. या प्रवेशाने उदगीर नगरपालिकेचं राजकारण ढवळून निघालं आहे. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक ताहेर सय्यद यांच्यासह पाच नगरसेवक आपल्या समर्थकांसह मुंबईकडे रवाना झाले आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यलयात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नवाब मलिक, यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.
काहीही करुन नगरपालिका खेचायची, राज्यमंत्री बनसोडेंचा प्रण!
उदगीर नगर पालिकेमध्ये सध्या भाजपाची सत्ता आहे. एकूण सदस्य संख्या -44,असलेल्या या पालिकेत भाजपा-23,काँग्रेस-14, एमआयएम-07,NCP-00, अशी सदस्य संख्या आहे. राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी नगर पालिका राष्ट्रवादीकडे खेचून आणण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे, एमआयएम नगरसेवकांचा प्रवेश देखील याच तयारीचा एक भाग आहे.
एमआयएमच्या जिल्हाध्यक्षांसह पाच नगरसेवकांचा एमआयएमला गुडबाय
गेल्या महिन्यात काँग्रेसनेही उदगीरमध्ये पक्ष बांधणीसाठी दोन सभा घेतल्या आहेत. या सभेत पालकमंत्री अमित देशमुख यांनी स्वतंत्र लढणार असं जाहीर केलेलं आहे, तर आ. धिरज देशमुख यांनी उदगीरमध्ये थांबून पालिका निवडणुकीचं नियोजन करणार असल्याचं जाहीर भाषणात सांगितलं आहे. त्या नंतर काँग्रेस ही राष्ट्रवादीला गृहीत धरून चालली आहे अशी चर्चा सुरू होती. त्यातच एमआयएमच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने उदगीरमध्ये राष्ट्रवादी पालिका निवडणुकांची जय्यत तयारी करीत आहेत हे स्पष्ट झालं आहे.
एमआयएमने मराठवाडयात प्रवेश करताना उदगीरमध्ये आपले सात नगरसेवक निवडून आणले होते.आता त्याच उदगीर मध्ये एमआयएमला खिंडार पडले आहे. राष्ट्रवादीला प्रवेश केलेल्या या पाच नगरसेवकांचा येणाऱ्या निवणुकीत किती फायदा होतो, यावर राष्ट्रवादीचं पालिकेतील भवितव्य ठरणार आहे.
(Latur District MIM president And udgir nagarpalika 5 Carporator Will join NCP)
हे ही वाचा :
जावयाकडे गांजा सापडलाच नाही, गांजा आणि तंबाखूमधील एनसीबीला फरक कळतो की नाही?; नवाब मलिक यांचा सवाल
मला चारचाकी परवडत नाही, चालत जाईन नाहीतर रांगत, शिवेंद्रराजेंच्या ‘दुचाकी’ टीकेवर उदयनराजेंचा भडका
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला महाविकास आघाडीच्या नेत्यांची हजेरी?; संजय राऊत म्हणाले…