लातूर : लातूर जिल्ह्यात शिवजयंतीच्या निमित्ताने वेगळाच राजकीय योग पाहायला मिळाला. निलंगा शहरात शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला राजकारणातले कट्टर विरोधक आजोबा आणि नातू (Latur Nilangekar Grandfather Grandson) एकत्र आले होते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले नातू, भाजपचे माजी मंत्री, आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे एकत्र आले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील तरुण पिढी घडली जावी, यासाठी ‘शिवसंकल्प कार्यक्रमा’चं आयोजन निलंग्यात करण्यात आलं होतं. या निमित्ताने हे दोघे राजकीय विरोधक एकाच मंचावर दिसले.
गेली अनेक वर्षे कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात एकमेकांवर टोकाची टीका करणारे, एकमेकांच्या विरोधात विधानसभा निवडणुका लढवणारे हे आजोबा-नातू एका मंचावर आलेले कोणालाच आठवत नाहीत.
नातवाने काँग्रेसी आजोबांच्या सभा अनेकदा उधळल्याचीही उदाहरणं आहेत. टीका-विरोध हा निलंगेकरांमध्ये नवीन नाही. नातं असलं तरी घर मात्र वेगळं आहे. पक्षही वेगळा. त्यामुळे निलंगा मतदारसंघातले कार्यकर्तेही इकडे राहायचं की तिकडे या पर्यायाचा विचार करतात. शिवजयंतीच्या निमित्ताने का असेना, आजोबा-नातवाची जोडी एकाच मंचावर (Latur Nilangekar Grandfather Grandson) आजूबाजूला दिसली.