मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणारा वकील मुख्यमंत्र्यांच्या जवळचा : शरद पवार
बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 ला जनतेला वेगवेगळी आश्वासने दिली. मात्र पाच वर्षात त्याबद्दल काहीच केलं नाही. त्यामुळेच आता मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलीत करण्यासाठी पंतप्रधानांपासून भाजप नेत्यांकडून प्रयत्न चाललेत ही चिंतेची बाब असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. नरेंद्र मोदी सातत्याने पाकिस्तानला लक्ष्य करुन लोकांची भावना वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करतात आणि […]
बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 ला जनतेला वेगवेगळी आश्वासने दिली. मात्र पाच वर्षात त्याबद्दल काहीच केलं नाही. त्यामुळेच आता मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलीत करण्यासाठी पंतप्रधानांपासून भाजप नेत्यांकडून प्रयत्न चाललेत ही चिंतेची बाब असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. नरेंद्र मोदी सातत्याने पाकिस्तानला लक्ष्य करुन लोकांची भावना वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचवेळी ते नियोजित दौरा नसताना पाकिस्तानच्या पंतप्रधानांची भेट घेतात. आताच्या पंतप्रधानांशी त्यांचे काय संबंध आहेत माहिती नाही. मात्र टोकाची भूमिका घेऊन सत्ता टिकवण्याचा प्रयत्न सुरु असल्याची शंका येईल, अशीच परिस्थिती असल्याचं शरद पवार यांनी एका उदाहरणासह सांगितलं. सरकारची आरक्षणविरोधी भूमिका आहे. त्यामुळेच न्यायालयात आरक्षण टिकणार नाही, अशी भूमिका हे सरकार घेत असल्याचं सांगतानाच मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणारे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असल्याचा खळबळजनक आरोप शरद पवार यांनी केला.
बारामती येथील गोविंद बाग या निवासस्थानी शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्यांवरुन केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला.
“सरकारची आरक्षणाविरोधात भूमिका”
धनगर, मराठा, मुस्लीम आरक्षणाचा निर्णय घेतो म्हणून झुलवत ठेवायचे आणि घेतलेले कोणतेच निर्णय कोर्टात टिकणार नाहीत, अशी भूमिका या सरकारने घेतल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय. मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणारे वकील नागपूरचे आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना राज्याचे अॅडव्होकेट जनरल नेमलं होतं. त्यांनी नंतर राजीनामा दिला आणि काळा कोट घालून वकिली सुरू केली. वकिली करण्याचा त्यांचा अधिकार आहे, त्यांच्याबद्दल माझी काही तक्रार नाही. पण मुख्यमंत्र्याच्या जवळचे लोक आरक्षणाविरोधात याचिका दाखल करतात ही फसवाफसवी आहे. एकीकडे लोकांच्या अपेक्षा वाढवायच्या, आम्ही निर्णय देतो, म्हणत उत्सव साजरा करा असे सांगायचे, तरुणांची आशा वाढवायच्या आणि दुसर्या बाजूने निर्णय कसा अडकून राहील याची भूमिका घ्यायची हे या सरकारचे धोरण असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.
“मूळ प्रश्नांना बगल देण्याचं काम”
“लोक दुष्काळाची चिंता करतात. आज राज्यात बेरोजगारी, महागाई, दुष्काळ गंभीर आहे. पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही. मात्र या राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून पंतप्रधानांपर्यंत सारेच जण या महत्वाच्या प्रश्नाला बगल देऊन जवानांच्या शौर्याचा उपयोग सत्ता मिळविण्यासाठी करत आहेत. त्यांच्याकडे आता विकासाचे म्हणून सांगण्यासारखे काहीच नाही. मागील निवडणुकीत ‘अच्छे दिन’चे आश्वासन देणारे पंतप्रधान आता राष्ट्रीयत्वाचा मुद्दा पुढे करीत आहेत. राष्ट्रवादाचे प्रश्न काढून मूळ विषयाला विचलित करण्याचा प्रयत्न पंतप्रधानांपासून त्यांचे सर्व सहकारी करत आहेत, हे निषेधार्ह आहे. मुळात बुलडाण्यात राठोड नावाचे जवान शहीद झाले, त्यांच्या अंत्यविधीवेळी पंतप्रधान तेथून अवघ्या 40 किलोमीटरवर होते. देशासाठी शहीद झालेल्या जवानाला, त्याच्या कुटुंबीयांना भेटावे, कुटुंबीयांचे सांत्वन करावे, असे त्यांना त्यावेळी वाटले नाही. मात्र आता या जवानांच्या शौर्याचा लाभ राजकारणासाठी ते करत फिरत आहेत. त्यांच्या नावावर मते मागत आहेत. हा प्रकार म्हणजे टाळूवरचे लोणी खाणं आहे,” असं शरद पवार यांनी म्हटलंय.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या वक्तव्यावरील प्रश्नावर पवार म्हणाले, मोदी सातत्याने पाकिस्तानविरोधात मी चॅम्पियन आहे असे म्हणतात. पण लोकांची भावना एका दिशेने नेण्याचा प्रयत्न आणि दुसर्या बाजूने पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी संबंध असे दुहेरी ते वागतात. आताच्या पंतप्रधानांशी त्यांचे कसे संबंध आहेत, हे मला सांगता येणार नाही. मात्र त्यांच्या या संबंधांवरून मला एक वाचनात आलेली गोष्ट आठवली. दोन राष्ट्रात कटुता होती, तेव्हा सत्ता टिकवण्यासाठी आम्ही काय करतो हे सांगताना त्यापैकी एका राष्ट्रप्रमुखाने स्टेटमेंट दिले होते की, आम्हाला संधी मिळेल तेव्हा लोकांचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही एकदम टोकाची भूमिका घेतो आणि सत्ता हातात ठेवतो. खरेतर सध्याची स्थिती पाहता असे काही चित्र येथे चालले आहे, अशी शंका येथे येऊ शकेल अशी स्थिती असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय.
बारामतीत यावेळी मोठ्या विजयाचा दावा
भाजपने बारामतीवर लक्ष केंद्रीत करत त्यांच्या सर्व नेत्यांच्या सभा बारामतीत असल्याबाबत विचारलं असता शरद पवार यांनी बारामतीत मुख्यमंत्री येऊन गेले. भाजपाध्यक्ष अमित शाह येणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्मृती इराणी सभा घेणार आहेत हे ऐकायला मिळाल्याचं सांगितलं. बारामती मतदारसंघात येथील सर्वांनी सातत्याने एक भूमिका कायम ठेवली. त्या विचाराला सातत्याने पाठिंबा दिला. या भक्कम पाठिंब्यामुळे सत्ताधारी पक्षाला येथे काही यश मिळत नाही म्हणून हा देशभरातील मारा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण मी इथे काही जणांशी बोललो, तेव्हा त्यांच्या सांगण्यानुसार आमच्यावर भाजपवाल्यांनी एवढा मारा त्यांनी केला आहे, आता आम्ही नेहमीपेक्षा जास्त मारा करू अशी या लोकांचीच चर्चा असल्याचं त्यांनी नमूद केलं.
“काँग्रेसची 72 हजारांची घोषणा योग्यच”
काँग्रेसकडून 72 हजार रुपये देण्याच्या घोषणेबाबत शरद पवार यांनी सहमती दर्शवली. याबाबत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी सखोल अभ्यास केल्यानंतरच याबद्दल घोषणा केली. त्यामुळे याबाबतचं अर्थशास्त्र समजावून घेऊन उद्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्याची परिस्थिती हाताळण्यात भाजप-शिवसेनेला अपयश आले आहे. निवडणुकीच्या पूर्वी देशात अच्छे दिन आणण्याचं, भ्रष्टाचार कमी करण्याचे आश्वासन देण्यात आलं. पाच वर्षे झाल्यानंतर आश्वासनाबाबत काय झाले हे लोक विचारतील, त्याला टाळण्यासाठी लोकांच्या समोरचे विषय बाजूला ठेवून राष्ट्रवाद, राष्ट्रीयत्व हे मुद्दे समोर आणेलत. या देशातील प्रत्येक नागरिकाला राष्ट्रीयत्वाची आस्था आहे, हे शिकविण्याचा विषय नाही. देशावर कसलेही संकट आले तरी पडेल ती किंमत देणारा हा भारत देश आहे. मात्र राष्ट्रवादाचे प्रश्न काढून मूळ विषयाला विचलित करण्याचा प्रयत्न पंतप्रधानांपासून होतोय, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. लोकांचे प्रश्न काय आहेत हे समजून घ्यायला हवे, दुर्दैवाने ते होत नसल्याचंही शरद पवार यांनी सांगितलं.
“शेतकरी प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी”
राज्यात अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झालंय, सरकारला गांभीर्य नाही. अनेक शेतकरी उद्ध्वस्त झालेत. उस्मानाबादला आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट घेतली. त्याने निवेदने देऊनही सरकारने कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. तो शेतकरी दुष्काळ आणि सक्तीच्या वसुलीने त्रासलेला होता. त्यामुळे त्याने टोकाची भूमिका घेतली. आता त्यांच्या भावानेही असंच पत्र दिलंय. टोकाची भूमिका घेण्यापर्यंत शेतकरी का जातायत याची कारणमीमांसा समजून घेतली पाहिजे, त्यांचं समाधान केलं पाहिजे, त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली पाहिजे. मात्र आजच्या राज्यकर्त्यांचं पूर्णपणाने याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याबाबत शरद पवारांनी चिंता व्यक्त केली. निवडणुकीत महागाईसह अन्य अनेक मुद्दे आहेत. मात्र सध्याचे सत्ताधारी महत्वाच्या प्रश्नांना बगल देऊन जवानांच्या नावावर मत मागण्याचा गलिच्छपणा करत असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.