आधी कुणाची सभा ऐकणार?, एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? अजित पवारांनी उघडपणे सांगितलं…
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाही कुणाची सभा आधी ऐकणार, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी स्पष्टपणे आपलं मत मांडलं.
रणजीत जाधव, प्रतिनिधी, TV9 मराठी, पिंपरी-चिंचवड: मुंबईत आज दोन दसरा मेळावे होत आहेत. एक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Dasara Melava) यांचा दसरा मेळावा. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Dasara Melava) यांचा दसरा मेळावा. या दोन्ही सभांपैकी कुठली ऐकणार अशी सध्या चर्चा होतेय. अशात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनाही कुणाटची सभा आधी ऐकणार, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी स्पष्टपणे आपलं मत मांडलं.
मी यंदा दसऱ्याला मी माझ्या घरी चाललोय. काटेवाडीत जाऊन मी आईला भेटणार आहे. तिकडं दसरा साजरा करणार आहे. संध्याकाळी सातच्या आसपास या सभा सुरु होतील. आधी उद्धव ठाकरे यांची सभा होईल. ती मी आधी ऐकणार. त्यानंतर मग एकनाथ शिंदे यांची सभा होईल. ती मी ऐकणार, असं अजित पवार म्हणालेत. ते आज पिंपरी-चिंचवडमध्ये होते. यावेळी माध्यामांशी बोलताना त्यांनी आपलं मत मांडलं.
कोरोनामुळे दोन वर्ष कुणालाच असे जाहीर कार्यक्रम झाले नव्हते. फार साधेपणाने आपल्याला सणवार साजरे करावी लागले. आता हा मेळावा होतोय. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे, असं अजित पवार म्हणालेत.
अजित पवार यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना सबुरीचा सल्लाही दिलाय. ठाकरे-शिंदेंनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, कटुता निर्माण होईल असं कोणतंही कृत्य करू नये, असं अजित पवार म्हणाले आहेत. आज दसरा मेळावा होतोय. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना विचारलं असता त्यांनी हे उत्तर दिलंय.