शिंदे सरकारवर पहिला भ्रष्टाचाराचा आरोप, दिवाळी गिफ्टवर अंबादास दानवेंचा आक्षेप काय?
मंत्रिमंडळ बैठकीत नुकत्याच झालेल्या एका निर्णयावर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आक्षेप नोंदवलाय. शिंदे सरकार कोट्यवधींचा भ्रष्टातार करत असल्याचा दानवेंचा आरोप आहे..
मुंबईः सामान्य जनतेची दिवाळी गोड करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) एक निर्णय घेतला. राज्यातील शिधापत्रिका धारकांना साखर, रवा, चणा डाळीचं पीठ आणि तेल या चार गोष्टींचं पॅकेज केवळ 100 रुपयांत देण्याची योजना घोषित केली. दिवाळी फूड किट असं या पॅकेजला म्हटलं जातंय. या फूड किटच्या निविदा प्रक्रियेवरून विधान परिषद नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आक्षेप घेतलाय.
या प्रक्रियेसाठी घाई घाईने 513 कोटी 24 लाख रुपयांची निविदा प्रक्रिया पार पाडण्यात आली, असा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय. अवघ्या तीन दिवसात ही निविदा आटोपली. यासाठी खुली स्पर्धा ठेवली गेली नाही, असा आरोप दानवेंनी केलाय.
लाभार्थ्यांची संख्या लक्षात घेता प्रत्येकी 302 रुयये धरले तरी 512 कोटी रुपयांच्या वर याचं बजेट जात नाही, असा आरोप दानवेंनी केलाय.
या निविदा प्रक्रियेची चौकशी करावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. या वस्तू खरेदी करा, पॅकेट करा, वितरण करा, यासाठीचा ट्रान्सपोर्टेशन खर्च करण्याऐवजी या वस्तूंसाठीचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावेत, अशी मागणीही दानवे यांनी केली आहे.
दानवे म्हणाले, 1 कोटी 70 लाख लोकांना याचा फायदा होणार आहे. लाभार्थी माहिती असतील तर हे पैसे थेट द्या.
खरेदी करा, ट्रान्सपोर्टेशन करा… हे कशाला करायचं. समजा 10 लाख लोकांनी हे घेतलंच नाही तर तुम्ही काय करणार?
सगळेच लोक स्वस्त धान्य दुकानात जातीलच असं नाही. खुल्या बाजारात खरेदी केलं तर या चार गोष्टींसाठी प्रत्येकी पावणे तीनशे रुपयांच्या वर लागत नाही, असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलंय.
सदर योजनेसाठी सरकारने 486 कोटी 94 लाख रुपये खर्चाला मान्यता दिली आहे. दिवाळीपूर्वीच हे किट वाटप केलं जाणार असल्याचं शिंदे सरकारकडून जाहीर करण्यात आलंय.
मात्र या योजनेत घोटाळा होत असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय. याला एकनाथ शिंदे काय उत्तर देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.