“आमचं बारिक लक्ष आहे, बंडखोर आमदार पैशाचा पाऊस पाडताहेत, त्यांना जागा दाखवून देऊ”, अजित पवारांचा इशारा
अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर टीका केली आहे. तसंच त्यांना इशाराही दिलाय.
भूषण पाटील, प्रतिनिधी, कोल्हापूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर टीका केली आहे. तसंच त्यांना इशाराही दिलाय. आम्ही तुमच्यावर बारकाईने यांच्यावर लक्ष ठेवून आहोत. 40 आमदार पैशाचा पाऊस पाडत आहेत. कोल्हापुरात देखील गद्दार लोकं निघाली आहे. कोल्हापुरात देखील त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणालेत. ते कोल्हापुरात बोलत होते.
ज्या ज्यावेळी शिवसेना फुटली. त्या त्यावेळी निवडणुकीत आमदार पडलेत, हा इतिहास आहे. नारायण राणे तर पोटनिवडणुकीतही पडले, असं अजित पवार म्हणालेत.
एकनाथ शिंदे म्हणत होते की, लोक स्वतःहून आले. मग भाषणावेळी उठून का जातं होते याचं पण त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे. सभेला कोट्यावधींचा खर्च केला. ते दहा कोटी कुठून आले? शिंदे साहेब हा महाराष्ट्र आहे असं इथं चालणार नाही. मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणाला लोकांमधून समोरून प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला समोरून प्रतिसाद मिळत होता, असं म्हणत अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यावरही भाष्य केलंय.
वेदांता प्रकल्प गुजरातला गेला. त्यानंतर शिंदे दिल्लीला गेले आणि हात हलवत परत आले, असं म्हणत अजित दादांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
कोल्हापुरात अजित पवार यांचं भाषण सुरु होतं. यावेळी माइक बिघडला. त्यावर अजितदादांनी मिश्किल टिप्पणी केली. चार जणांची भाषणं झाली काही खरखर नाही आणि माझ्या भाषणावेळी खर खर सुरू झाली..आपलं आहे का कुणाचं आहे बघा… दुसरं कुणी पाठवलं का बघा… असं अजित पवार म्हणालेत.