विधानपरिषद निवडणूक आणि वाद, महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचे नवे समीकरण ?
महाराष्ट्रात आता विधान परिषदेच्या निवडणुका आणि घोळ हे काही नवीन राहिले नाही. जून महिन्यात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडून आणला याचा साक्षीदार संपूर्ण देश आहे.
सुमित सरनाईक, TV9 मराठी : आत्ता काल परवा नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक परिषद आणि पदवीधर निवडणुकीतही मोठा गोंधळ महाराष्ट्राच्या जनतेला पहायला मिळाला. या निवडणुकीत सगळ्यात महत्त्वाचा आणि विशेषतः चर्चेचा आणि आरोप प्रत्यारोपाचा विषय ठरला तो म्हणजे काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीचा विषय. सत्यजित तांबे यांनी वडील सुधीर तांबे यांच्या नावे आलेला काँग्रेसचा एबी अर्ज न भरता स्वतः अर्ज भरला आणि काँग्रेसला ऐनवेळी दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागला. ज्या तांबे आणि थोरात कुटुंबाला येणाऱ्या 2030 साली काँग्रेसमध्ये शंभर वर्षे पूर्ण होतात. त्याच घरातील सत्यजित तांबे आणि त्यांचे वडिल सुधीर तांबे यांनी काँग्रेसचा अर्ज न भरता अपक्ष अर्ज दाखल केला.
त्यांनी काँग्रेस पक्षाची एक प्रकारे फसवणूक केली ? असे अनेक आरोप मागील जवळपास एक महिना तांबे कुटुंबावर अनेक आरोप प्रत्यारोप होत राहिले. मात्र त्यांनी हे सर्व कुठलीही प्रतिक्रिया न देत संयमाने घेतले. निवडणूक संपली सत्यजित तांबे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आणि आमदारही झाले. मात्र, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात एकच प्रश्न होता तो म्हणजे तांबे यांनी ऐनवेळी असा का निर्णय घेतला ? ज्यामुळे महाविकास आघाडी आणि काँग्रेसला आपला एक आमदार गमवावा लागला. आत्ता ज्याप्रमाणे सत्यजित तांबे यांचा उमेदवारीची चर्चा झाली तशीच 1996 साली काँग्रेसचे दिलखुलास नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याही उमेदवारीची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती.
विलासराव देशमुख यांचा विधानपरिषद निवडणुकीतील रंजक किस्सा
विलासरावांशी संबंधित महाराष्ट्राच्या राजकारणातला हा रंजक किस्सा आहे. त्याचे झाले असे 1995 ला विलासराव देशमुख यांचा सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत थोड्या फरकाने पराभव झाला. विलासराव यांनी त्यावेळी महाराष्ट्रातील एक मातब्बर नेते म्हणून आपली ओळख आपल्या कामातून निर्माण केली होती. तरी 1995 ला झालेला पराभव त्यांच्या फार जिव्हारी लागला होता. ते फार अस्वस्थ होते. नंतर 1996 साली विधान परिषद निवडणूक लागली. मात्र, विधानसभेत पराभूत झालेल्यांना विधान परिषदेत संधी देऊ नये, अशी भूमिका काँग्रेसने घेतली. तरीही काँग्रेसमध्ये असलेल्या शरद पवार यांनी त्यांचे समर्थक असलेल्या छगन भुजबळ यांचे नाव विधान परिषदेसाठी पुढे केले.
विलासरावांनी काँग्रेस विरोधात बंड करत शिवसेनेचा पाठिंबा घेत विधान परिषद निवडणूक लढवण्याचे ठरवले. 1996 ला युतीचे सरकार महाराष्ट्रात सत्तेत होते. विलासरावांची ही भूमिका त्यांचे मित्र आणि तत्कालीन लोकमतचे संपादक जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना पटली नाही. त्यांनी विलासराव यांच्या विरोधात एक अग्रलेख लिहिला ‘विनाश काले ‘विलास’बुद्धि’. त्यावर विलासराव म्हणाले, भावेजी हे तुमच्याकडून अपेक्षित नाही. मधुकर भावे यांनी त्यांना स्पष्ट सांगितले, ‘विलासराव देशमुख यांच्याकडून हे अपेक्षित नाही. तुम्ही चूक करताय मी तुम्हाला पाडणार आहे.
मधुकर भावे हे त्यानंतर नागपूरवरून मुंबईला आले. रायगडमध्ये सुनील तटकरे यांच्या रोहा या गावी गेले. मधुकर भावे यांनी सुनील तटकरे यांना विलासरावाला मतदान करायचे नाही असे सांगितले. तटकरे त्यावेळी आमदार होते आणि विलासरावांच्या मर्जीतले होते. तरीही त्यांनी भावे यांचा मान राखत विलासरावांना मतदान केले नाही आणि विलासरावांचा अर्ध्या मताने विधानपरिषदेत पराभव झाला. या पराभवानंतर मधुकर भावे आणि त्यांचे सहकारी स्वतः अर्धा किलो पेढ्याचा बॉक्स घेऊन विलासराव यांना भेटायला गेले.
विलासरावांना ते म्हणाले, हे घ्या पेढे. त्यावर विलासराव म्हटले कशासाठी ? तुमचा पराभव झाला म्हणून हे पेढे आणले मधुकर भावे उत्तरले. विलासरावांनी तो पेढ्याचा बॉक्स फेकला. सर्वत्र पेढे झाले. भावे यांनी तो बॉक्स घेत आपल्या सहकाऱ्याला पेढा भरवला आणि विलासराव पराभूत झाल्याबद्दल टाळ्या वाजवल्या. मात्र, हे सर्व करण्यामागे मधुकर भावे यांची विलासराव देशमुखांबद्दलची काळजी होती. कारण त्यांना माहीत होते विलासराव उद्याचे काँग्रेसचे मोठे नेते आहेत. ते शिवसेनेत जाऊन आपले नुकसान करतील आणि झालेही तसेच.
1999 ला विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक लागली आणि पुन्हा लातूरमधून विधानसभेसाठी विलासराव उभे राहिले आणि महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्क्याने म्हणजेच जवळपास 95 हजारापेक्षा जास्त लीड घेऊन ते विजयी झाले. 1999 ला आमदार म्हणून विजयी झाल्यानंतर स्थापन झालेल्या राज्य सरकारचे नेतृत्त्वही विलासरावांनी केले. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर शिवसेनेसोबत गेल्याने आपली मोठी चूक झाली असती असे जाहीरपणे त्यांनी कबूलही केले. ( ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी त्यांच्या पुस्तकात हा किस्सा लिहिलेला आहे. )
हा किस्सा सांगण्याचा मुख्य उद्देश हा आहे की काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद ते काही आत्ताचे नाहीत. या आधीपासून ते सातत्याने सुरू आहेत. मात्र, सत्यजित तांबे यांच्यासंदर्भात झालेल्या वादाला कुठे तरी द्वेषाच्या राजकारणाची झालर पाहायला मिळते. मागील एक महिन्यापासून तांबे परिवार काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यासोबतच काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची ही भूमिका काय आहे याबद्दलही सर्वांना उत्सुकता होती. अखेर सत्यजित तांबे यांनी विस्तृत पत्रकार परिषद घेत आपले म्हणणे मांडले आणि काँग्रेसमधील अंतर्गत वादाला उघडे केले. सत्यजित तांबे यांनी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांनीच कुरघोडीचे राजकारण करत आपल्याला पक्षातून बाहेर घालवण्याचा प्रयत्न केला असे आरोप करत नाना पटोलेंना लक्ष केले.
सत्यजित तांबे यांच्या भूमिकेवरून काही प्रश्न निर्माण होतात
– सत्यजित तांबे यांचे म्हणणे आहे की मी पक्षाला सातत्याने म्हणत होतो की मला कुठेतरी काम करण्याची संधी द्या मात्र मला ती संधी देण्यात आली नाही. हे बघता ज्या सत्यजित तांबे यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम केले त्यांची जर ही स्थिती असेल तर सामान्य युवकांच्या मनात काँग्रेसमध्ये त्यांना काम करायला संधी मिळेल की नाही ? असा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे
– सत्यजित तांबे यांना जर काँग्रेसकडून निवडणूक लढवायची होती तर त्यांनी अर्ज भरल्यानंतर मी भाजपकडे पाठिंबा मागणार असे वक्तव्य का केले ? कारण त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावरील आरोपांमध्ये सत्यता आहे का? हा प्रश्न निर्माण झाला आणि आणखी गोंधळ वाढला.
– दुसरीकडे बघायला गेलं तर जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून स्वतःला बघणाऱ्या भाजपला नाशिक पदवीधरमध्ये साधा उमेदवार मिळाला नाही? आम्ही योग्य ती भूमिका घेऊन असे शेवटपर्यंत म्हणणाऱ्या भाजपने ऐनवेळी स्थानिक पातळीवर सत्यजित तांबेंना पाठिंबा दिला. त्यांच्या या पाठिंब्यामुळे सत्यजित तांबे यांनी हे सगळे ठरवून केले का ? असा प्रश्न निर्माण झाला.
काँग्रेसच्या भूमिकेमुळे निर्माण झालेले प्रश्न
– सुधीर तांबे यांना निलंबित करण्यात आले त्यावेळी निलंबनाआधी कारणे दाखवा नोटीस का पाठवली नाही? यावरून काँग्रेस पक्षश्रेष्ठीबद्दल प्रश्न निर्माण होतात.
– दुसरीकडे सत्यजित तांबे यांनी केलेल्या आरोपानंतर नाना पटोले हे पत्रकारांसमोर ज्याप्रकारे चिडले त्यावरून नाना पाटोले आणि महाराष्ट्र प्रदेश काला र्यकारणीचा यामध्ये हात आहे का ? हा प्रश्न निर्माण झाला
या सगळ्या प्रकरणावर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पत्रकार परिषद घेत आम्ही तांबे परिवाराला कोरे ए बी फॉर्म पाठवले होते असा दावा केला. कोणाचेही नाव नसलेल्या ए बी फॉर्मचे स्क्रीन शॉट मी स्वतः बाळासाहेब थोरात यांचे OSD सचिन गुंजाळ यांना पाठवले होते त्यांनी त्यावर ओके असा रिप्लाय दिला असे ते म्हणाले. मात्र, अतुल लोंढे यांचे हे दावे सचिन गुंजाळ यांनी पत्र काढून फेटाळले. त्यांनी या पत्रकात घटनाक्रम सांगितला तो कसा होता पाहू!
AB Form घटनाक्रम ( सचिन गुंजाळ यांच्याशी संबंधित )
9 जानेवारी : सायंकाळी संघटन सरचिटणीस देवानंद पवार यांच्याकडे AB Form संदर्भाने विचारणा
10 जानेवारी : नागपूर येथे संध्याकाळी 7 वाजता सीलबंद पाकिटात AB Form मिळाले.
11 जानेवारी :
1.30 PM : नाशिकऐवजी नागपूर आणि औरंगाबाद विधानपरिषदचे AB Form आल्याची सत्यजीत तांबे यांची माहिती.
2.00 PM : संघटन सरचिटणीस देवानंद पवार यांना फोन करून चुकीचे फॉर्म आल्याची माहिती.
3.20 PM : पूर्वी झालेली चूक पुन्हा होऊ नये म्हणून देवानंद पवार यांच्याकडून AB Form चे फोटो मागितले.
3.24 PM : WhatsApp वर AB Form चा फोटो मिळाला.
3.32 PM : सचिन गुंजाळ यांच्याकडून OK असे उत्तर ( महत्त्वाची नोंद : सदर OK हे फोटो कॉपी वर आहे तेव्हा AB Form नागपूरमध्ये होते, नाशिकमध्ये नाही )
4.30 PM : नागपूरहून पुन्हा सीलबंद पाकिटात AB Form ताब्यात घेतले.
12 जानेवारी :
1.00 PM : सत्यजीत तांबे यांच्या ताब्यात AB Form चे सीलबंद पाकीट दिले.
1.30 PM : सत्यजित तांबे यांचा फोन पुन्हा AB फॉर्म डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाने आल्याची माहिती.
वरील घटनाक्रमावरून असे लक्षात येते की एबी फॉर्म सत्यजित तांबे याना कोरे मिळाले नव्हते?
राहुल गांधी अंतर्गत द्वेष मिटवतील का ?
त्यांच्या या आरोप प्रत्यारोपात काँग्रेसचे मात्र मोठे नुकसान झाले. कारण, काँग्रेसने आपल्या हक्काची एक जागा गमावली. या सगळ्या अंतर्गत वादाकडे बघता एक लक्षात येते. या देशातील द्वेष मिटवण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी जवळपास 3570 किलोमीटरची भारत जोडो पदयात्रा काढली. मात्र, एवढे सगळे करूनही देशाचे तर माहित नाही पण काँग्रेसमधील अंतर्गत द्वेष तरी ते मिटवू शकले का? हा प्रश्न आहे.
पक्षातील हे सगळे द्वेषाचे राजकारण बघता भारत जोडो यात्रेनंतर त्यांना आता काँग्रेस जोडो यात्रा काढावे लागते की काय अशी परिस्थिती आहे. तसेच, तांबे आणि काँग्रेस वादात नेमकी बाजू कोणाची खरी आहे ? हे येणारा काळच ठरवेल. आज जरी सत्यजित तांबे अपक्ष राहत असल्याचे म्हणत असतील तरी ते भविष्यात कोणती भूमिका घेणार ? काँग्रेसमध्ये आपले मामा बाळासाहेब थोरात यांच्याकडे राजकीय घरवापसी करणार ? की ज्या फडणवीसांना ते मोठे भाऊ मानतात त्याचे बोट धरून राजकारण करणार ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे…