कायद्याच्या विपरित निर्णय दिला काय हे दाखवू द्या; राहुल नार्वेकर यांचं आव्हान
शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा बहुप्रतिक्षित निकाल दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची सर्वत्र चर्चा सुरु आहे. राहुल नार्वेकर यांच्यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून प्रचंड टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठीचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी राहुल नार्वेकर यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत नार्वेकर यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली आहेत.
मुंबई | 11 जानेवारी 2024 : शिवसेना आमदार अपात्रेच्या प्रकरणाचा निकाल दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देशभर चर्चेत आले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची टीव्ही 9 मराठी चॅनलचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कु्मावत यांनी मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत राहुल नार्वेकर यांनी त्यांच्यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून होत असलेल्या विविध आरोपांवर उत्तरे दिली आहेत. आपण कोणाच्याही रोषाला घाबरत नाही. जो काही निर्णय निर्णय दिला आहे तो न्यायबूद्धीने दिला आहे. हवेतर तुम्ही आपण कायद्याच्या विपरित काय निर्णय दिला हे दाखवून द्यावे असे आवाहनच राहुल नार्वेकर यांनी केले आहे.
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन उभी फूट पाडल्यानंतर शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटांनी एकमेकांविरोधात आमदारांना अपात्र करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने या आमदारांच्या अपात्र याचिकांची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपविली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एकदा 31 डिसेंबर तर एकदा 10 जानेवारी अशी डेडलाईन वाढवून दिली होती. काल 10 जानेवारी रोजी राहुल नार्वेकर यांनी बहुप्रतिक्षित आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल वाचून दाखविला. 1200 पानांच्या या निकाल पत्रात राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाच्या प्रमाणे निकाल देत खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याचे स्पष्ट केले आहे.
कुछ तो लोक कहेंगे..
कोणी काय आरोप करते किंवा कोणाला या निकालातून काय फायदा होईल, वाईट वाटेल किंवा चांगले वाटेल या गोष्टीचा मी विचार केलेला नाही. तर मी न्याय बुद्धीने कामच करु शकणार नाही. त्यामुळी मी अशा आरोपांकडे यापूर्वीही लक्ष दिलं नाही, निकाल देतानाही लक्ष दिलं नाही आणि निकाल दिल्यानंतरही लक्ष देण्याची मला गरज वाटत नाही असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे. मी जो निर्णय दिलेला आहे तो अत्यंत सुस्पष्ट आणि कायद्याला धरुन आहे. प्रत्येक निर्णयातले निकष कसे ठरवले गेले आहेत, त्यापाठी कायदेशीर बाबी काय आहेत, या सगळ्यांचा उल्लेख मी माझ्या ऑर्डरमध्ये केला आहे. त्यामुळे ज्या लोकांना या ऑर्डरविषयी संशय वाटतो, किंवा ते समाधानी नसतील तर त्यांनी दाखवून द्यावं की या निकालामध्ये असं काय आहे, जे कायद्याच्या विपरीत आहे. आरोप करणं सोपं असतं. कुछ तो लोक कहेंगे. कायद्याला धरुन निकाल असेल तर तो तसाच असेल असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.