औरंगाबाद, कोल्हापूर ते कल्याण-डोंबिवली, फेब्रुवारीत 5 महापालिकांच्या निवडणुकीचा धुरळा?

| Updated on: Dec 24, 2020 | 6:41 PM

राज्यातील 96 नगरपालिकांसाठीही फेब्रुवारी महिन्याच्या आसपास निवडणुका पार पडतील. | Mahanagar Palika election 2021

औरंगाबाद, कोल्हापूर ते कल्याण-डोंबिवली, फेब्रुवारीत 5 महापालिकांच्या निवडणुकीचा धुरळा?
Follow us on

मुंबई: कोरोना संकटामुळे लांबणीवर पडलेल्या राज्यातील पाच बड्या महानगरपालिकांची (Mahanagar Palika Election) निवडणूक फेब्रुवारी महिन्यात पार पडण्याची शक्यता आहे. महाविकासआघाडी सरकारकडून लवकरच यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे. (Local bodies and Mahanagar Palika election 2021 in Maharashtra)

सूत्रांच्या माहितीनुसार, औरंगाबाद, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई-विरार या पाच महानगरपालिकांसाठी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होणार आहे. याशिवाय, राज्यातील 96 नगरपालिकांसाठीही फेब्रुवारी महिन्याच्या आसपास निवडणुका पार पडतील. त्यामुळे राज्यात फेब्रुवारी महिन्यात राजकीय रणधुमाळी अनुभवायला मिळू शकते.

नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महाविकासआघाडीने भाजपला धूळ चारली होती. त्यामुळे सध्या महाविकास आघाडीसाठी राज्यभरात अनुकूल वातावरण असल्याची चिन्हं दिसत आहेत. परिणामी महाविकासआघाडीने याचाच फायदा घेत फेब्रुवारी महिन्यात बड्या महानगरपालिकांच्या निवडणुका उरकण्याचे ठरवले असावे, असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.

जानेवारी महिन्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी

जानेवारी महिन्यात राज्यातील 14, 232 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी 15 जानेवारीला मतदान होईल, तर 18 जानेवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. या निवडणुकीत महाविकासआघाडीने विधानपरिषद निवडणुकीतील कामागिरीची पुनरावृत्ती करायचे ठरवले आहे. तर भाजपने विधानपरिषद निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीत जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांनीही मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणूक संपूर्ण सामर्थ्याने लढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका रंगतदार होण्याची शक्यता आहे.

राज्यातील आगामी निवडणुकांमध्ये भाजपला प्रचंड यश मिळेल: दरेकर

राज्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत (Grampanchyat election) भाजप (BJP) मोठी मुसंडी मारेल, असे भाकीत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी वर्तविले आहे. सध्या देशभरात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला प्रचंड यश मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही भाजपला अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचा दावा प्रवीण दरेकर यांनी केला होता.

कोणत्या महापालिकेत किती जागांसाठी मतदान?

नवी मुंबई – 111

औरंगाबाद – 113

वसई-विरार – 115

कल्याण डोंबिवली 122

कोल्हापूर 81

संबंधित बातम्या:

तुमच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर

मनसेने शड्डू ठोकला, 4134 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवणार

(Local bodies and Mahanagar Palika election 2021 in Maharashtra)