Maharashtra Loksabha Dhule | धुळे लोकसभा ठरणार अंतर्गत कलहाचे कारण, भाजप की शिंदे गट? भाजप जोखीम घेणार?
Dhule Lok Sabha Election 2024 | धुळे लोकसभा अंतर्गत कलहाचे कारण तर ठरणार नाही ना? अशी भीती भाजपला वाटू लागलीय. त्यातच नाशिकच्या बदल्यात धुळे मतदारसंघ शिवसेना (शिंदे गटाला) देण्याची तयारी भाजपकडून होत असल्याच्या चर्चेने इच्छुक उमेदवारांचे धाबे दणाणले आहे.
महेश पवार | 29 फेब्रुवारी 2024 : धुळे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या अनेक उमेदवारांची एकच भाऊ गर्दी झालीय. भाजपाचे निरीक्षक श्रीकांत भारती आणि माजी मंत्री राम शिंदे यांची या मतदारसंघाची चाचपणी केली. यावेळी भाजपच्या तब्बल 9 इच्छुक उमेदवारांनी तिकीटाची मागणी केलीय. त्यामुळे धुळे लोकसभा अंतर्गत कलहाचे कारण तर ठरणार नाही ना? अशी भीती भाजपला वाटू लागलीय. त्यातच नाशिकच्या बदल्यात धुळे मतदारसंघ शिवसेना (शिंदे गटाला) देण्याची तयारी भाजपकडून होत असल्याच्या चर्चेने इच्छुक उमेदवारांचे धाबे दणाणले आहेच. शिवाय, त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारीही केलीय.
मुंबई येथे नुकतीच काँग्रेसची आढावा बैठक झाली. यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा मतदार संघ काँग्रेसनेच मागून घ्यावा, अशी आग्रही मागणी पुढे आली. त्यामुळे महायुती प्रमाणेच महाविकास आघाडीतही तू तू मै मै होण्याची दाट शक्यता निर्माण झालीय. तब्बल 50 वर्ष या मतदारसंघावर कॉंग्रसने राज्य केले होते. पण, गेल्या 15 वर्षापासून भाजपने येथे वर्चस्व प्रस्थापित केलेय. त्यामुळे भाजपच्या विजयाची ही मालिका सुरूच रहाणार की खंडित होणार याचीच चर्चा होतेय.
भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी सलग दोन वेळा येथून विजय मिळविला आहे. पण, 2024 मध्ये त्यांना पुन्हा तिकीट मिळेल की नाही याची शंका आहे. दिल्ली नेतृत्वाने नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत नवे चेहरे देत जातीचे राजकारण जुळवून आणले. त्यामुळे भाजपला तीन राज्यात मोठे बहुमत मिळाले. हीच खेळी भाजप लोकसभा निवडणुकीत खेळत आहे. त्याचमुळे डॉ. भामरे यांना तिकीट मिळणार की त्यांचा पत्ता कट होणार ही शंका आहे.
धुळे लोकसभा मतदार संघात धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर, मालेगाव बाह्य आणि सटाणा असे विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदार संघावर ज्या पक्षाचा प्रभाव त्याच पक्षाला येथे विजय मिळतो हा इतिहास आहे. या मतदारसंघात पूर्वी शिवसेना नेहमी भाजपा उमेदवारामागे उभी होती. त्याचा भाजपला फायदा होत होता. पण, आता शिवसेनेचे (शिंदे गट) मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव अविष्कार भुसे यांचे भावी खासदार असे फलक धुळ्यात झळकू लागले आहेत. त्यामुळे धुळे मतदारसंघ भाजपकडे जाणार की शिंदे गटाकडे हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत आहे.
मागील 15 वर्ष वगळता त्याआधी 50 वर्ष या मतदार संघावर कॉंग्रेसने राज्य केले. त्यामुळेच काँग्रेसच्या आढावा बैठकीमध्ये अनेक इच्छुकांची नावे पुढे आली. आमदार कुणाल पाटील, धुळे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, नाशिक जिल्हा अध्यक्ष तुषार शेवाळे यांची नावे या यादीत आहेत. तर, भाजपच्या यादीत तब्बल 9 नावे आली आहेत. धुळे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाचे 9 इच्छुक उमेदवार पुढे आले आहेत. विद्यमान खासदार सुभाष भामरे यांच्यासह माजी सनदी अधिकारी प्रतापराव दिघावकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष धरती देवरे, भाजपाच्या पदाधिकारी माधुरी बाफना, डॉक्टर विलास बच्छाव, जिल्हा परिषदेच सदस्य हर्षवर्धन दहिते, बिंदू माधव हे प्रमुख इच्छुक उमेदवार आहेत.
भाजपाची सत्ता असलेल्या धुळे मतदार संघाचा गड सहजपणे शिंदे गटाला मिळण्याची शक्यता तशी कमीच आहे. त्याचे कारण म्हणजे धुळे शहर, धुळे तालुका आणि शिंदखेडा या मतदारसंघात अद्याप शिंदे गटाला पक्ष बांधणी करता आलेली नाही. त्यामुळे बूथस्तरापर्यंत शक्ती असणारा भाजपा हा मतदार संघ शिंदे गटाला सोडण्याची शक्यता नाहीच. त्याचवेळी डॉ. सुभाष भामरे यांचा जनसंपर्कही मोठा असल्याने त्यांना दुर करणे हे ही भाजपाला जोखमीचे ठरू शकते.
एमआयएमचीही हालचाल सुरु
धुळे लोकसभा मतदार संघामधील मालेगाव मध्य आणि धुळे शहर या दोन विधानसभा मतदारसंघात एमआयएमचे आमदार आहेत. जिल्ह्यात धार्मिक धुव्रीकरणाच्या राजकारणामुळे भाजपला यश मिळत आहे. पण जिल्ह्यातील अल्पसंख्यांकांची संख्याही अधिक आहे. यामुळेच हे दोन मतदार संघ एमआयएमकडे गेले. याच अल्पसंख्यांकांच्या मतांच्या आधारावर एमआयएमनेही लोकसभा निवडणुक उमेदवारीसाठी हालचाली सुरु केल्या आहेत.