Rahul Gandhi | राहुल गांधी यांनी शपथ घेताना केली मोठी चूक! खासदारांनी आठवण करून दिली आणि…
कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी खासदारकीची शपथ घेण्यासाठी येताना सोबत संविधानाची प्रत आणली होती. सत्ताधारी पक्षाला त्यांनी राज्यघटनेची प्रत दाखवून त्यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. पण, यावेळी त्यांच्याकडून एक चूक झाली...
18 व्या लोकसभेचे विशेष अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी नवनिर्वाचित खासदारांनी शपथ घेतली. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. मात्र, यावेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी चूक केली. खासदार म्हणून शपथ घेण्यासाठी राहुल गांधी यांनी संविधानाची प्रत सोबत आणली होती. त्यांनी राज्यघटनेची प्रत सत्ताधारी पक्षाला दाखवून लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. खासदारपदाची शपथ घेताना राहुल गांधी यांनी एका हातात संविधानाची प्रत धरली होती. मात्र, सदस्यत्वाची शपथ घेताना त्यांच्या हातून एक चूक घडली.
उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघामधून राहुल गांधी निवडून आले आहेत. लोकसभेच्या कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. ते कन्नौज लोकसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. शपथ घेताना त्यांच्या हातात देखील संविधानाची प्रत होती. अखिलेश यादव यांच्याशिवाय त्यांच्या पत्नी आणि मैनपुरीच्या सपा खासदार डिंपल यादव यांनीही शपथ घेतली.
मुझफ्फरनगरचे सपा खासदार महेंद्र मलिक, कैरानाचे खासदार इक्रा चौधरी, फिरोजाबादच्या खासदार अक्षय यादव, बदाऊनचे खासदार आदित्य यादव आणि अन्य अनेक समाजवादी पक्षाच्या खासदारांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यांच्यानंतर राहुल गांधी शपथविधीसाठी त्यांचे नाव पुकारताच बहुतांश विरोधी सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत केले. केवळ काँग्रेसच नाही तर इतर विरोधी पक्षांच्या खासदारांनीही उभे राहून त्यांचे स्वागत केले.
राहुल गांधी यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर त्यांनी जय हिंद, जय संविधानाचा नारा दिला. शपथ घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी प्रथेनुसार अध्यक्षांची भेट न घेता थेट सही केली. राहुल गांधी सही करून पुढे निघाले. त्याचवेळी काँग्रेससह अन्य खासदारांनी राहुल गांधी यांनी अध्यक्षांची भेट न घेतल्याची आठवण करून दिली. राहुल गांधी यांना आपल्याकडून झालेल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी पुन्हा माघारी फिरून अध्यक्षांची भेट घेतली. यावेळी काँग्रेस सदस्यांनी आपापल्या जागी उभे राहून ‘जोडो जोडो, भारत जोडो’च्या घोषणा दिल्या. राहुल गांधी यांनी हंगामी अध्यक्ष यांचे अभिनंदन केले. अध्यक्ष यांनीही त्यांचे अभिनंदन स्वीकारले. लोकसभेत शपथ घेताना अनेक विरोधी सदस्य हातामध्ये संविधानाची प्रत घेऊन सभागृहात पोहोचले होते.