2019 मध्ये फक्त लोकसभाच नाही, या आठ राज्यातही निवडणूक!
नवी दिल्ली : नववर्षाचे मोठ्या थाटामाटात स्वागत झाले. 2019 हे वर्ष राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाचं ठरणार आहे. कारण यावर्षी लोकसभा निवडणुकांसोबतच आठ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यावर्षी महाराष्ट्र, हरियाणा, आंध्र प्रदेश, झारखंड, जम्मू-काश्मीर, ओदिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्किममध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुका भाजप आणि काँग्रेससोबतच इतर पक्षांसाठीही महत्त्वाच्या असणार आहेत. लोकसभा निवणुका तोंडावर […]
नवी दिल्ली : नववर्षाचे मोठ्या थाटामाटात स्वागत झाले. 2019 हे वर्ष राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाचं ठरणार आहे. कारण यावर्षी लोकसभा निवडणुकांसोबतच आठ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यावर्षी महाराष्ट्र, हरियाणा, आंध्र प्रदेश, झारखंड, जम्मू-काश्मीर, ओदिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्किममध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुका भाजप आणि काँग्रेससोबतच इतर पक्षांसाठीही महत्त्वाच्या असणार आहेत.
लोकसभा निवणुका तोंडावर आल्याने सर्वच राजकीय पक्ष आता निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. यातच मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड ही तीनही राज्य काँग्रेसने भाजपकडून हिसकावून घेतली, त्यामुळे आता भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक 2019 साठी कंबर कसली आहे.
केंद्रात सध्या भाजपचे सरकार आहे. या आठ राज्यांपैकी महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि अरुणाचल प्रदेशात भाजप सत्तेत आहे. तर ओदिशा, आंध्र प्रदेश आणि सिक्किम या तीन राज्यांत त्या त्या क्षेत्रातील पक्ष सत्तेत आहेत आणि जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे. या आठ राज्यांपैकी एकाही राज्यात काँग्रेस सत्तेत नाही. त्यामुळे काँग्रेससाठी या निवडणुका निश्चितच महत्त्वाच्या ठरणार आहेत. 2018 मध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानात झालेल्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसने भाजपचा पराभव करत सत्ता स्थापन केली आहे.
2014 पर्यंत केंद्रात तसेच महाराष्ट्र, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशातही काँग्रेसची सत्ता होती. मात्र मोदींसमोर काँग्रेस टिकू शकलं नाही. तर ओदिशामध्ये बिजू जनता दल (बीजेडी), जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि सिक्किममध्ये एसडीएफ सत्तेत होते. 2014 च्या निवडणुकांपर्यंत भाजपकडे या आठ राज्यांपैकी एकही राज्य नव्हते हे विशेष. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ही काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.
महाराष्ट्र :
महाराष्ट्रात सध्या देवेंद्र फडणवीस सरकार आहे. एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीपूर्वीच युती जाहीर केली. तर दुसरीकडे मात्र शिवसेनेने ऐनवेळेवर भाजपची साथ सोडली आहे. शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. तरीही भाजपला असा विश्वास आहे की, शिवसेना युती करणार. 2014 सालच्या निवडणुकांमध्ये 288 जागांपैकी 121 जागांवर भाजप, 66 जागांवर शिवसेना विजयी ठरली होती. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेने युतीचे सरकार स्थापन केले होते. काँग्रेसला या निवडणुकांमध्ये 42 जागांवर समाधान मानावे लागले होते. तर 41 जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या होत्या, उर्वरित जागांवर अपक्ष आणि इतर छोटे पक्ष जिंकून आले होते.
हरियाणा :
हरियाणातही 2014 पासून भाजपची सत्ता आहे. महाराष्ट्र आणि हरियाणाची निवडणूक एकाच दिवशी होत असते. मनोहर लाल खट्टर हे हरियाणाचे मुख्यमंत्री आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये 90 जागांपैकी 47 जागांवर भाजप विजयी ठरली होती. यात काँग्रेस 17, आयएनएलडी 19 जागा जिंकल्या होत्या. तर सात जागांवर अपक्ष आणि इतर छोटे पक्ष जागा जिंकल्या होत्या.
झारखंड :
2014 च्या निवडणुकांमध्ये भाजपने 82 पैकी 43 जागा मिळवल्या होत्या. तर 19 जागा झारखंड मुक्ती मोर्चा आणि 9 जागा काँग्रेसच्या पदरी पडल्या होत्या. 2019 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर काँग्रेसने झारखंड मुक्ती मोर्चाला आपल्या सोबत घेतले आहे. ज्याचे परिणाम नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत दिसून आले. जिथे काँग्रेस बहुमताने जिंकली.
आंध्र प्रदेश :
चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी पक्षाने 2014 च्या निवडणुकांमध्ये 175 पैकी 102 जागा मिळवत बहुमत मिळवलं होतं. तर जगनमोहन रेड्डीच्या व्हायएसआर काँग्रेस पक्षाला 66 जागा मिळाल्या होत्या. इथे भाजपच्या खात्यात फक्त चार जागा आल्या होत्या. 2014 च्या निवडणुकांमध्ये टीडीपी आणि भाजप एकत्र होते. मात्र आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्यावर हे दोन पक्ष वेगळे झाले. सध्या नायडू भाजपच्या विरुद्ध विरोधी पक्षाला सोबत घेण्याच्या प्रयत्नात आहेत.
ओदिशा :
2014 च्या निवडणुकांमध्ये ओदिशात 147 जागा होत्या. ज्यापैकी बीजेडी 117 जागा जिंकून सत्तेत आहे. इथे काँग्रेसच्या खात्यात 16, भाजपच्या खात्यात 9 जागा आल्या होत्या. ओदिशात आगामी निवडणुकांत भाजप विरुद्ध बीजेडी लढत बघायला मिळणार आहे.
सिक्किम :
सिक्कीममध्ये मागील 25 वर्षांपासून पवन चामलिंग हे मुख्यमंत्री आहेत. 2014 च्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष सिक्कीममध्ये एकही जागा मिळवू शकले नव्हते. येथील 32 जागांपैकी 22 जागांवर सिक्किम डेमोक्रेटीक फ्रंट (एसडीएफ) जिंकून आली, तर एसकेएमच्या खात्यात 10 जागा आल्या होत्या.
अरुणाचल प्रदेश :
2014 च्या निवडणुकांमध्ये अरुणाचल प्रदेशच्या 60 जागांपैकी 42 जागांवर काँग्रेस जिंकून आली. तर भाजपने अरुणाचल प्रदेशमध्ये पहिल्यांदाच 11 जागा जिंकल्या होत्या. तर पीपीएच्या खात्यात पाच आणि इतरांच्या खात्यात दोन जागा आल्या होत्या.
जम्मू-काश्मीर :
जम्मू-काश्मीरमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. मात्र स्थानिक पक्ष विधानसभा निवडणुकांची मागणी करत आहेत. इथे यावर्षी निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. इथे एकूण 89 (2 नामांकित) जागा आहेत. 2014 च्या निवडणुकांमध्ये महबूबा मुफ्ती यांचा पीडीपी पक्ष 28 जागांवर तर भाजप 25 जागांवर जिंकून आला होता. येथे पीडीपी आणि भाजपने युती करत सत्ता स्थापन तर केली, मात्र नोव्हेंबर महिन्यातच भाजपने पीडीपीचा साथ सोडली. ज्यानंतर विधानसभा भंग करण्यात आली आणि राज्यपाल राजवट लागू करण्यात आली. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स एकत्र येत निवडणुका लढवण्याची शक्यता आहे.