मुलाच्या करिअरसाठी गांधी परीवारातील ‘ती’ व्यक्तीही सोनिया गांधी यांच्या वाटेवर? भाजपची सोडणार साथ?
माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचा मुलगा जयंत सिन्हा यांना तिकीट नाकारल्यामुळे ते प्रचंड नाराज झाले आहे. जयंत सिन्हा यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे जाहीर केलेय. त्याचवेळी आणखी एका महिला नेत्याने मुलासाठी राजकारणातून निवृत्ती घेण्याची तयारी सुरु केलीय.
नवी दिल्ली | 7 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी पहिली यादी जाहीर केली. यात 195 उमेदवारांचा समावेश आहे. मात्र, यादित नाव नसल्यामुळे अनेक नेते नाराज झाले आहेत. विशेषत: 80 जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपने सलग दोन निवडणुकांमध्ये मोठा विजय मिळविला. याच उत्तर प्रदेशमधील 29 मतदारसंघांसह देशातील 150 हून अधिक लोकसभा मतदारसंघांच्या उमेदवारांची घोषणा भाजपने केलेली नाही. त्यामुळे नाराज खासदारांची संख्या वाढत आहे. आगामी निवडणुकीत त्यांच्या नाराजीचा फटका भाजपला बसण्याची चिन्हे दिसत आहेत. तर, दुसरीकडे भाजपच्या नाराज नेत्यांना आपल्याकडे खेचण्याची खेळी कॉंग्रेस खेळत आहे.
माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचा मुलगा जयंत सिन्हा यांना ह्जारीबागमधून तिकीट नाकारल्यामुळे ते प्रचंड नाराज झाले. जयंत सिन्हा यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे जाहीर केले. त्याचवेळी आणखी एका महिला नेत्याने मुलासाठी राजकारणातून निवृत्ती घेण्याची तयारी सुरु केलीय. या महिला नेत्या आहेत मनेका गांधी.
उत्तर प्रदेश राज्यातील पिलीभीत हा मनेका गांधी यांचा बालेकिल्लाच. 1996 पासून मनेका गांधी या मतदार संघातून सतत विजयी झाल्या आहेत. मात्र, 2019 च्या निवडणुकीत त्यांनी हा मतदारसंघ आपला मुलगा वरुण गांधी यांच्यासाठी सोडला. मनेका गांधी यांनी सुल्तानपूर या मतदार संघात निवडणूक लढविली आणि त्यात त्या विजयीही झाल्या.
भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये मनेका गांधी आणि वरुण गांधी यांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांच्या भवितव्याबाबतची अटकळ बांधली जात आहे. यूपीमध्ये भाजपने छोट्या पक्षांसोबत युती केली आहे. त्याचे जागावाटप अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे येथील काही जागांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. यामध्ये केंद्रीय मंत्री व्ही के सिंग (गाझियाबाद), मनेका गांधी (सुलतानपूर), वरुण गांधी (पीलीभीत) आणि कैसरगंजचे वादग्रस्त खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या मतदारसंघाचा समावेश आहे.
वरुण यांना तिकीट का नाही?
वरुण गांधी यांना यावेळी तिकीट देणे शक्य नाही अशी भाजपच्या सूत्रांची माहिती आहे. वरुण गांधी गेल्या अडीच वर्षांपासून आपल्याच राज्य आणि केंद्र सरकारला अस्वस्थ करणारे प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांनी अनेकदा उघडपणे पक्षावरच टीका केली होती. पक्षाच्या नियमांचे त्यांनी उल्लंघन केले होते. त्यामुळे वरुण यांना पिलीभीतमधून बदलण्याचा भाजप नेतृत्व गांभीर्याने विचार करत असल्याचे या सूत्रांचे म्हणणे आहे.
मेनका गांधी निवृत्ती घेणार का?
वरुण गांधी यांनी पक्षावर टीका केल्यामुळे मनेका गांधी यांचीही अडचण झाली होती. संसदेतील पक्षाच्या वरिष्ठ नेत्या असूनही त्यांना डावलण्यात येत होते. सप्टेंबर 2023 मध्ये जुन्या संसद भवनाच्या निरोप समारंभावेळी त्यांनी संसदेत भाषण करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खूप प्रशंसा केली होती. मात्र, यादीमध्ये नाव आल्याने त्या ही नाराज झाल्या आहेत.
मेनका गांधी यांच्या वहिनी सोनिया गांधी यांनी मुलगा राहुल गांधी यांच्यासाठी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. 2018 मध्ये सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांवरून निवृत्ती घेतली. त्यांच्या निवृत्तीनंतर राहुल गांधी यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनीही काँग्रेस अध्यक्षपद सोडले.
सोनिया गांधी यांनी त्यानंतर काही वर्षे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. आता मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. या वर्षी सोनिया गांधी निवडणुकीचे राजकारण सोडले आणि राज्यसभेच्या खासदार झाल्या. सोनिया गांधी यांनी मुलासाठी जे पाऊल उचलले तेच पाऊल मनेका गांधी मुलगा वरुण गांधी याच्यासाठी उचलणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.