भाजपच्या उमेदवारांची दुसरी यादी कधी होणार जाहीर, या ज्येष्ठ नेत्याने सांगितली तारीख…
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांचेही नाव पहिल्या यादीत नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, दुसरीकडे केंद्रीय मंत्री भारती पवार, भागवत कराड, कपिल पाटील, रावसाहेब दानवे, नारायण राणे यांचीही धाकधुक वाढली आहे.
नवी दिल्ली | 4 मार्च 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपने आपल्या 195 उमेदवारांची पहिली यादी शनिवारी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील एकही उमेदवार नाही. त्यामुळे महाराष्ट्राची यादी कधी जाहीर होणार याची उत्सुकता महाराष्ट्रातील नेत्यांना लागली आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांचेही नाव पहिल्या यादीत नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, दुसरीकडे केंद्रीय मंत्री भारती पवार, भागवत कराड, कपिल पाटील, रावसाहेब दानवे, नारायण राणे यांचीही धाकधुक वाढली आहे. दुसरीकडे, भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने भाजपची दुसरी यादी कधी जाहीर होणार याची तारीख सांगितली आहे. त्यामुळे या यादीत तरी महाराष्ट्रातील नेत्यांची नावे असणार का? या चिंतेत राज्यातील भाजप नेते आहेत.
शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीमधून अनेकांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलीय. तर, काही जणांचा पत्ता कट केलाय. काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलीय. त्यामुळे भाजपमध्ये सध्या ‘कभी ख़ुशी कभी गम’ असे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्याने दुसरी यादी बुधवारी जाहीर होण्याची शक्यता आहे असे म्हटलेय.
भाजपच्या संसदीय मंडळाचे सदस्य आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची दुसरी यादी बुधवारी जाहीर होऊ शकते, असे संकेत दिले आहेत. बुधवारी नवी दिल्लीला पक्षाची बैठक आहे. त्यासाठी मी जात आहे. याच दिवशी शक्यतो लोकसभा उमेदवारांची कर्नाटकासह दुसरी यादी अंतिम केली जाऊ शकते. या यादीबाबत अंतिम निर्णय सर्वोच्च नेतृत्व घेईल, अशी माहिती त्यांनी दिलीय.
बीएस येडियुरप्पा यांनी उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत कर्नाटकातील सर्व 28 मतदारसंघातील उमेदवार असतील का? यावर आताच सांगणे कठीण आहे. पण, फार उशीर होणार नाही. सर्व जागांसाठी उमेदवार जाहीर करता येतील. कर्नाटकात काही नव्या चेहऱ्यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या मनात काय आहे याची आपल्याला कल्पना नाही. या यादीबाबत अंतिम निर्णय दिल्लीतील पक्षाचे नेतेच घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. येडियुरप्पा यांनी राज्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सहयोगी जनता दल (धर्मनिरपेक्ष) ला किती जागा दिल्या जातील याचा खुलासा केला नाही. मात्र, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील पक्षासोबत तडजोड केली जाईल, असे ते म्हणाले.
दरम्यान, 2 मार्च रोजी भाजपने 16 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यातील 2 उमेदवारांनी निवडणूक लढविण्यास नकार दिलाय. उत्तर प्रदेशच्या बाराबंकी लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार उपेंद्र सिंह रावत यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. सोशल मीडियावर एक अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. जोपर्यंत मी निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत मी सार्वजनिक जीवनात कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असे ते म्हणाले. तर, आसनसोलमधून भाजपचे उमेदवार पवन सिंह यांनी निवडणुकीत उभे राहण्यास नकार दिला आहे.