एनडीए आणि यूपीएतील पक्षांची यादी, तिसराच पक्ष किंगमेकर ठरणार?
नवी दिल्ली : जवळपास दोन महिने चाललेल्या लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा सोमवारी पूर्ण होईल. यानंतर 23 मे रोजी निकाल येईल. भाजपकडून स्पष्ट बहुमत गाठणार असल्याचा दावा केला जातोय, तर विरोधी पक्षातील नेतेही सक्रिय झाले आहेत. भाजपला बहुमत न मिळाल्यास समीकरणांची जुळवाजुळव आत्तापासूनच सुरु झाली आहे. बहुमतासाठी 272 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे भाजपप्रणित एनडीए आणि काँग्रेसप्रणित […]
नवी दिल्ली : जवळपास दोन महिने चाललेल्या लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा सोमवारी पूर्ण होईल. यानंतर 23 मे रोजी निकाल येईल. भाजपकडून स्पष्ट बहुमत गाठणार असल्याचा दावा केला जातोय, तर विरोधी पक्षातील नेतेही सक्रिय झाले आहेत. भाजपला बहुमत न मिळाल्यास समीकरणांची जुळवाजुळव आत्तापासूनच सुरु झाली आहे. बहुमतासाठी 272 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे भाजपप्रणित एनडीए आणि काँग्रेसप्रणित यूपीए हा आकडा गाठणार का याकडे लक्ष तर आहेच, पण कुणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्यास प्रादेशिक पक्षही किंगमेकर ठरु शकतात.
कोण कुणाच्या बाजूने?
सद्यपरिस्थितीमध्ये देशातील राजकारणात चार गट आहेत. एनडीए, यूपीए हे प्रमुख तर आहेतच, पण तिसरा गट असा आहे जो काँग्रेससोबत जाऊ शकतो, तर चौथा गट कुणाच्याही बाजूने नाही. भाजपप्रणित एनडीएमध्ये 40 पेक्षा जास्त पक्ष आहेत. पण जास्त प्रभाव असणारे नऊ पक्ष आहेत. भाजपच्या प्रमुख मित्रपक्षांमध्ये बिहारमधील जेडीयू आणि महाराष्ट्रातील शिवसेना आहे. यासोबतच यावेळी दक्षिण भारतातील सत्ताधारी पक्ष एआयएडीएमके भाजपसोबत आङे. 2014 च्या निवडणुकीत या पक्षाने तामिळनाडूमध्ये 36 जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजप, एआयएडीएमके, पीएमके, डीएमडीके एकत्र निवडणूक लढवत आहेत. भाजपचा सर्वात जुना मित्र पक्ष अकाली दल तर सोबत आहेच, शिवाय रामविलास पासवान यांचाही पक्ष भाजपला साथ देईल.
यूपीएतील परिस्थिती काय?
काँग्रेसच्या नेतृत्त्वातील यूपीए म्हणजेच संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये सध्या लालू प्रसाद यादव यांचा आरजेडी, शरद पवारांचा राष्ट्रवादी, जेडीएस, आरएलएसपी, डीएमके, एआययूडीएफ आणि जेएमएम हे महत्त्वाचे पक्ष आहेत. या गटाला मायावतींची बसपा, अखिलेश यादव यांची सपा, ममता बॅनर्जींची टीएमसी, सीपीआयएम, आप आणि चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपीचीही साथ मिळू शकते. उत्तर प्रदेशात सपा आणि बसपाने जास्त जागा मिळवल्यास त्यांचं महत्त्वही वाढणार आहे.
तीन असे नेते आहेत, जे सध्या कुणाच्याही बाजूने नाहीत. यामध्ये ओदिशाचे मुख्यमंत्री आणि बीजेडी प्रमुख नवीन पटनायक यांचा पहिला क्रमांक लागतो. 2014 च्या निवडणुकीत बीजेडीने ओदिशातील 20 जागा जिंकल्या होत्य. पटनायक हे सलग 18 वर्षांपासून ओदिशाचे मुख्यमंत्री आहेत.
दुसरा मोठा चेहरा आहे तो तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि टीआरएस प्रमुख चंद्रशेखर राव. केसीआर यांच्याकडून गैरकाँग्रेस आणि गैरभाजपा तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न केला जातोय. त्यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरु आहेत. टीआरएसकडे सध्या 10 खासदार आहेत. यानंतर वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांचा क्रमांक लागतो. त्यांनी ना एनडीए, ना यूपीए अशी भूमिका घेत स्वबळावर निवडणूक लढवली. त्यामुळे त्रिशंकू परिस्थितीमध्ये केसीआर, नवीन पटनायक आणि जगनमोहन रेड्डी हे महत्त्वाची भूमिका निभावू शकतात.