रमजानच्या महिन्यात मतदानाला मुस्लिम धर्मगुरुंचा विरोध
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. 10 मार्चला निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतर या तारखांवरुन आता एक नवा वाद पेटला आहे. रमजानच्या महिन्यात निवडणुका घेतल्याने मुस्लिम धर्मगुरु नाराज झाले आहेत. त्यांनी रमजानच्या महिन्यात मतदानाला विरोध केला आहे. तर दुसरीकडे काही विरोधी पक्षांनीही पवित्र रमजानच्या महिन्यात मतदानावर राजकारण करण्यास सुरुवात केली आहे. […]
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. 10 मार्चला निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतर या तारखांवरुन आता एक नवा वाद पेटला आहे. रमजानच्या महिन्यात निवडणुका घेतल्याने मुस्लिम धर्मगुरु नाराज झाले आहेत. त्यांनी रमजानच्या महिन्यात मतदानाला विरोध केला आहे. तर दुसरीकडे काही विरोधी पक्षांनीही पवित्र रमजानच्या महिन्यात मतदानावर राजकारण करण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणूक 2019 मधील 543 पैकी 169 जागांवर रमजानच्या महिन्यात मतदान घेतले जाणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि दिल्लीच्या जागांवर शेवटच्या तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. यावर्षी रमजानचा महिना 5 मेपासून सुरु होतो आहे. त्यामुळे शेवटच्या तीन टप्प्यांमध्ये म्हणजेच 6, 12 आणि 19 मे रोजी होणारे मतदान हे रमजानदरम्यान होणार आहे.
निवडणुकांवर काय परिणाम होणार
रमजानमध्ये मुस्लिम बांधव यांचा रोजाचा उपवास असतो. या दरम्यान ते सकाळपासून ते सायंकाळपर्यंत काहीही खात नाही. त्यामुळे जर रमजानच्या महिन्यात मतदान झाले तर, मुस्लिम मतदार तासंतास रांगेत उभं राहून मतदानाचा हक्क कसा बजावतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच या महिन्यात मतदान घेतल्याने मुस्लिम मतदारांचा टक्काही घसरु शकतो. त्यामुळे त्या-त्या भागातील मुस्लिम ज्या पक्षाला मतदान देणार असतील त्यां पक्षाला याचं मोठं नुकसान होऊ शकतं.
देशाच्या तीन महत्त्वाच्या आणि मोठ्या राज्यांमध्ये रमजानदरम्या शेवटच्या तीन टप्प्यांतील मतदान होणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. या तिनही राज्यांवर रमजानदरम्यान मतदानाचा विपरित परिणाम बघायला मिळू शकतो. उत्तर प्रदेशात 41 जागांवर, बिहारमध्ये 21 जागांवर तर पश्चिम बंगाल आणि दिल्लीमध्ये 31 जागांवरील रमजानदरम्यान मतदान होणार आहे. या राज्यांमध्ये लोकसभा जागांची संख्या सर्वाधिक आहे, तसेच येथे मुस्लिम मतदारांची संख्या ही निर्णायक ठरते.
टीएमसी नेतेही नाराज
लोकसभेच्या तारखांना राजकीय पक्षांतूनही विरोध केला जात आहे. कोलकात्याचे महापौर आणि टीएमसी नेते फरहाद हकीम म्हणाले की, बिहार, उत्तर प्रदेस आणि बंगालमध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. या तिन्ही राज्यांत अल्पसंख्याकांची लोकसंख्या अधिक आहे. त्यामुळे त्यांना रोजादरम्यान मतदान करावे लागणार आहे. निवडणूक आयोगाने या संबंधी विचार करुन तारखा ठरवायला हव्या होत्या. तसेच, अल्पसंख्याकांनी मतदान करु नये यासाठी भाजपने ही खेळी केल्याचा आरोपही फरहाद हकीमने केला.
रमजानच्या महिन्यात मतदान झाले तर फायदा भाजपचाच – अमानतुल्लाह खान
दिल्लीचे आपचे मुस्लिम चेहरे आणि ओखला विधानसभेतून खासदार असलेले अमानतुल्लाह खान यांनीही रमजानदरम्यान मतदानाला विरोध केला आहे. याचा फायदा सरळ सरळ भाजपला होणार असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी याबाबत ट्वीट केले की, “12 मेच्या दिवशी दिल्लीमध्ये रमजान असेल, मुस्लिम मतदान कमी करेल आणि याचा सरळ फायदा भाजपला होईल.”
12 मई का दिन होगा दिल्ली में रमज़ान होगा मुसलमान वोट कम करेगा इसका सीधा फायदा बीजेपी को होगा।
— Amanatullah Khan AAP (@KhanAmanatullah) March 10, 2019
तारखांबाबत योगेंद्र यादवांचे प्रश्न
स्वराज इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी लोकसभा निवडणुकांच्या तारखांबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
-
- महाराष्ट्राच्या निवडणुका 4 टप्प्यांत का घेतल्या जाणार?
- ओदिशाचं मतदान 4 टप्प्यांत तर आंध्रप्रदेशचं आणि तेलंगाणाचं एका टप्प्यात का?
- पश्चिम बंगालचं मतदान 7 टप्प्यांमध्ये का?
- मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुका एका दिवसात होऊ शकतात, तर लोकसभेसाठी 4 टप्पे का?
Some genuine Qs (no accusation)for EC:
* Why Odisha in 4 phases, when AP/Tel in 1 Ph?
* Why extend WB to 7 Ph?
* If MP state poll in 1 day, why LS in 4 Ph?
* Why decouple snow bound areas of HP and Uttkd?
* Why extend Maha to 4 Ph?
* Why decouple assembly & LS polls in JK?
— Yogendra Yadav (@_YogendraYadav) March 10, 2019
हा वाद अनावश्यक – ओवेसी
एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही लोकसभेच्या निवडणुकांवरुन पेटलेल्या वादावर आपले मत मांडले आहे. त्यांच्यामते हा वाद अनावश्यक आहे. आपल्या स्वार्थासाठी मुस्लिमांचा आणि रमजानचा वापर करु नका, अशी ताकिदही ओवेसींनी दिली. मुस्लिम बांधव रमजानमध्ये रोजे ठेवतात, ते बाहेरही जातात आणि आपलं सामान्य जीवनही जगतात. गरीब मुस्लिमही रोजे ठेवतात. माझ्या मते या महिन्यात मतदानाचा टक्का कमी होणार नाही तर वाढेल, असे ओवेसी म्हणाले.
Asaduddin Owaisi, AIMIM on voting during Ramzan: This whole controversy is totally uncalled for & unnecessary. I would earnestly request those political parties that please don’t use the Muslim community & Ramzan for whatever reasons you have. (1/2) pic.twitter.com/rytggFSaFF
— ANI (@ANI) March 11, 2019
निवडणुकीच्या तारखा जाहीर :
केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.
महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.