नागपुरात व्हीआयपी लढत, रामटेकमध्येही शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला
LOKSABHA ELECTION 2019 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात जागांसाठी मतदान होत आहे. नागपूरमध्ये 2065 मतदान केंद्र आहेत, तर 21 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 23 हजार कर्मचारी या कार्यासाठी लागले असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून साडे सात हजार पोलीस कर्मचारी तैनात आहेत. नागपूर आणि रामटेक अशा जिल्ह्यातील दोन मतदारसंघात मतदान होत आहे. कसा असेल […]
LOKSABHA ELECTION 2019 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात जागांसाठी मतदान होत आहे. नागपूरमध्ये 2065 मतदान केंद्र आहेत, तर 21 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 23 हजार कर्मचारी या कार्यासाठी लागले असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून साडे सात हजार पोलीस कर्मचारी तैनात आहेत. नागपूर आणि रामटेक अशा जिल्ह्यातील दोन मतदारसंघात मतदान होत आहे.
कसा असेल बंदोबस्त?
7500 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी
1500 होमगार्ड
350 पोलीस कर्मचारी बाहेरून मागविण्यात आले
सीआयएसएफची एक तुकडी
एसआरपीएफच्या दोन तुकड्या
क्वीक अक्शन फोर्स
नागपूर शहराची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. व्हीआयपी सुद्धा शहरात आहेत. त्या दृष्टिकोनातून प्रशासनाने तयारी केली कशी.
नागपूर लोकसभा मतदारसंघ
पहिल्या टप्प्यातील सर्वात लक्षवेधी लढत म्हणून नागपूर लोकसभा मतदारसंघाकडे पाहिले जात आहे. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या पारंपरिक नागपूर लोकसभा मतदारसंघातून लढत आहेत. नेहमीच सोपी असणारी ही निवडणूक यंदा मात्र त्यांच्यासाठी आव्हानात्मक झाली आहे. कारण भाजपचेच माजी खासदार आणि आता काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले हे गडकरींना आव्हान देत आहेत. मूळचे भंडारा-गोंदियातील असलेले नाना पटोले नागपुरात येऊन गडकरींना किती आव्हान देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
- नितीन गडकरी – भाजप
- नाना पटोले – काँग्रेस
रामटेक लोकसभा मतदारसंघ
शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाणे हे पुन्हा एकदा युतीकडून रामटेकमधून लढत आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवार ताकदवान नसल्याने शिवसेनेला रामटेकची जागा सोपी जाते. मात्र, यंदा काँग्रेसकडून किशोर गजभिये आणि वंचित बहुजन आघाडीकडून किरण रोडगे-पाटणकर रिंगणात असल्याने रामटेकमध्ये यंदा कोण बाजी मारतंय, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
- कृपाल तुमाणे – शिवसेना
- किशोर गजभिये – काँग्रेस
- किरण रोडगे-पाटणकर – वंचित बहुजन आघाडी
निवडणुकीच्या तारखा
केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.
महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.