Loudspeaker Row : ‘भाजपनं व्यंगचित्रकलेचा गळा घोटला!’ राज ठाकरेंचं नाव न घेता संजय राऊतांचे फटकारे
गेल्या तीन दिवसांपासून बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख महाराष्ट्राच्या चालू राजकीय घडामोडींमध्ये वारंवार होताना पाहायला मिळतोय.
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यंगचित्रकार असलेल्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे. ज्यांच्याकडे व्यंगचित्रकलेची क्षमता आहे, त्यांनी व्यंगचित्रकला (Cartoonist) सोडून भोंग्याचं राजकारण सुरु केलंय, असं संजय राऊतांनी म्हटलंय. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचा दाखल देत संजय राऊत यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. इतकंच काय तर, भाजपनं व्यंगचित्रकलेचा गळा घोटला, असं म्हणत त्यांनी सडकून टीका केली. कुंचल्याच्या फटकाऱ्यांनी देशाचं राजकारण बदललं. नाठाळांना ठिकाणावर आणलं. आर के लक्ष्मण आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर व्यंगचित्रकारांमध्ये पोकळी निर्माण झाली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, अनेक व्यंगचित्रकारांना आता लाईनही वाचत येत नाही आणि काही लाईनही बदलतात, असा खोचक टोला संजय राऊत यांनी अप्रत्यक्षणपणे राज ठाकरेंना लगावला. राज ठाकरेंच्या नावाचा कुठेही उल्लेख न करता संजय राऊत यांनी हे भाष्य केलंय.
नेमकं संजय राऊत काय म्हणाले?
संजय राऊत यांनी म्हटलंय, की,…
प्रसिद्ध व्यंगचित्रकार डेविड लो हा बाळासाहेबांचा आदर्श होता. हिटलाही डेविडनं घाम फोडला होता. बाळासाहेबांच्या फटकाऱ्यांनी कुणालाही सोडलं नाही. कुंचल्याची ताकद मोठी आहे. व्यंगचित्राच्या कुंचल्यापुढे आजही आम्ही नतमस्तक होतो. बाळासाहेबांसारखा व्यंगचित्रकार या देशाप पुन्हा निर्माण व्हावा.
देशात सध्या जे काही चाललंय, त्यावर भाष्य करण्याची क्षमता या कलेत आहे. पण ज्यांच्यामध्ये व्यंगचित्रकलेची ही क्षमता आहे, त्यांनी व्यंगचित्रकला सोडून भोंग्यांचं राजकारण सुरु केलंय.
बाळासाहेब ठाकरे आणि व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांना कोणत्याही भाडोत्री भोंग्याची गरज लागली नाही. पण भाजपनं व्यंगचित्रकलेचा गळा घोटलाय.
बाळासाहेबांचा सलग तिसऱ्या दिवशी उल्लेख
गेल्या तीन दिवसांपासून बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख महाराष्ट्राच्या चालू राजकीय घडामोडींमध्ये वारंवार होताना पाहायला मिळतोय. याची सुरुवात राज ठाकरेंनी 3 मे रोजी जारी केलेल्या पत्रात पहिल्यांदा पाहायला मिळाली होती. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना थेट चॅलेंज केलं होतं. बाळासाहेबांचे विचार ऐकणार आहात की शरद पवारांचे, असं म्हणत राज ठाकरेंनी थेट प्रहार केला होता.
त्यानंतर 4 मे रोजी राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचा एक व्हिडीओ ट्वीट करत टीका केली होती. बाळासाहेब ठाकरेंच्या जुन्या एका भाषणाचा हा व्हिडीओ होता. या व्हिडीओ बाळासाहेब ठाकरे हे मशिदींवरील भोंग्यांबाबत बोलताना दिसले होते. या दोन्ही उल्लेखांमधून बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार आपणच आहोत, असा सांगण्याचा प्रयत्न तर राज ठाकरेंकडून होत नाही ना? अशी चर्चा सुरु झाली होती. दरम्यान, संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रकलेचा दाखला देत राज ठारे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टोला हाणलाय.