भाजपाचा मुख्यमंत्री जाणार, काँग्रेसला अच्छे दिन!! कॅलेंडरच्या ‘त्या’ भविष्यवाणीने काँग्रेस के मन में लड्डू…!
पंचांगातील भविष्यवाणीने एकिकडे काँग्रेसला उत्साहाचं भरतं आलंय. तर भाजप सरकारचे मंत्री मोहन यादव यांनी जोरदार टीका केली आहे.
भोपाळः मध्य प्रदेश विधानसभा (Madhya Pradesh Assembly) निवडणुकीला १० महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. मात्र काँग्रेसच्या (Congress) गोटात सध्या आनंदाचे भरते आले आहे. कारण ठरलंय, एका कॅलेंडरमध्ये छापून आलेली भविष्यवाणी. सलग पाच वर्षे सत्तेत राहण्याचं काँग्रेसचं स्वप्न यंदा पूर्ण होणार असल्याचं संकेत या भविष्यवाणीतून देण्यात आलेत. भाजपचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांना हे नवं वर्ष संकटांनी घेरलेलं असेल, असंही यात सांगण्यात आलंय. त्यामुळे काँग्रेसला उत्साहाचं भरतं आलंय.
भविष्यवाणीत काय म्हटलंय?
मध्य प्रदेशमध्ये जबलपूर येथील एका लोकप्रिय पंचांग तथा कॅलेंडरमध्ये ही भविष्यवाणी करण्यात आली आहे. २०२३ हे वर्ष सुरुवातीपासून उत्तरार्धापर्यंत मुख्यमंत्र्यांसाठी संकटाचे ठरेल. सरकार बदलण्याचे मोठे संकेत आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी चर लग्नात शपथ घेतली. तसेच राज्येश चंद्र सहाव्या भावात सूर्यस्थानी असल्याने त्यांना ताकतीने काम करणे शक्य होणार नाही…
सरकारमध्ये आपापसातील समन्वय कमी पडेल. सत्तारुढ पार्टीतच मतभेद दिसून येईल. मंत्रिमंडळातही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस पूर्वीपेक्षा जास्त सशक्त दिसून येईल, असे संकेत या भविष्यवाणीतून देण्यात आले आहेत.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून या भविष्यवाणीचं जोरदार स्वागत केलंय जातंय. शिवराज सिंह चौहान यांनी आता सरकार बदलण्याची तयारी ठेवावी, असा संदेश काँग्रेस पदाधिकारी देत आहेत. काँग्रेस मीडिया सेलचे प्रमुख केके मिश्रा यांनी म्हटलंय, काँग्रेसने नेहमीच राजकीय मुद्द्यांना प्राधान्य दिलंय. मात्र श्रद्धा आणि धर्माचे मुद्दे तसेच पंचांगावरही आमचा विश्वास आहे. काँग्रेसच्या विजयावर आमचा पूर्ण विश्वास आहे….
काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कमलनाथ यांच्या माध्यम सल्लागार पियूष बबेले यांनीही ट्विट करून शिवराज सिंह यांची खुर्ची संकटात असल्याचं म्हटलंय.
मध्य प्रदेश के सबसे प्रतिष्ठित पंडित बाबूलाल चतुर्वेदी, जबलपुर के नव वर्ष पंचांग में जो भविष्यवाणी की गई है उसके मुताबिक़ शिवराज जी की कुर्सी ख़तरे में है और कांग्रेस की सरकार बनना तय है। हिमाचल पर उनकी भविष्यवाणी पहले ही सच साबित हो चुकी है। pic.twitter.com/oMIMkt05uI
— Piyush Babele||पीयूष बबेले (@BabelePiyush) January 15, 2023
पंडित बाबूलाल चतुर्वेदी यांच्या भुवन विजय पंचांगात मध्य प्रदेश सरकारविषयी ही भविष्यवाणी करण्यात आली आहे. याच पंचांगाने हिमाचल प्रदेशात काँग्रेसचं सरकार येण्याची भविष्यवाणी केली होती, जी खरी झाली.
पंचांगातील भविष्यवाणीने एकिकडे काँग्रेसला उत्साहाचं भरतं आलंय. तर भाजप सरकारचे मंत्री मोहन यादव यांनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेस मुंगेरीलालसारखे स्वप्न पाहत आहे.. हिंदूंचा अपमान करणारी काँग्रेस कॅलेंडरच्या भविष्यवाणीवर विश्वास ठेवतेय, अशी खोचक टीकाही केली आहे.