काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला मान्यता नाही, ज्योतिरादित्य शिंदे यांचा भाजपप्रवेश
जो काँग्रेस पक्ष आधी होता, तो आता राहिलेला नाही. काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला मान्यता मिळत नाही, अशी खंत ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपप्रवेशावेळी बोलून दाखवली Jyotiraditya Scindia enters BJP
नवी दिल्ली : काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर मध्य प्रदेशातील दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी दुसऱ्याच दिवशी भाजपचा झेंडा हाती धरला आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे आणि मध्य प्रदेशच्या भाजप प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत शिंदेंचा पक्षप्रवेश झाला. राजधानी दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात ज्योतिरादित्य शिंदेंनी भाजपप्रवेश केला. (Jyotiraditya Scindia enters BJP)
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी माझी साथ दिल्याबद्दल आभार. माझ्या आयुष्यात दोन तारखा महत्त्वाच्या आहेत. काही दिवस एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अविस्मरणीय असतात. पहिला दिवस, 30 मार्च 2001. या दिवशी मी माझ्या परमपूज्य वडिलांना गमावलं. तो माझं जीवन पालटणारा दिवस होता. तर दुसरा दिवस 10 मार्च 2020. त्यांच्या 75 व्या वाढदिवशी मी आयुष्यात वेगळा निर्णय घेतला.’ असं ज्योतिरादित्य शिंदे पक्षप्रवेशानंतर म्हणाले.
‘जनसेवा हे लक्ष्य असून राजकारण हे माध्यम आहे. मात्र काँग्रेसमध्ये आता जनसेवा करणं शक्य नाही. गेली 18-19 वर्ष श्रद्धेने काम केलं. जो काँग्रेस पक्ष आधी होता, तो आता राहिलेला नाही. काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला मान्यता मिळत नाही. 18 महिन्यात कमलनाथ सरकारकडून घोर निराशा झाली. शेतकरी कर्जमाफीची घोषणा पूर्ण केलेली नाही. नरेंद्र मोदी यांच्या सरकारला दोन वेळा अभूतपूर्व जनादेश मिळाला. त्यामुळे मोदींनी दाखवलेल्या रस्त्यावर चालण्याचा निर्णय मी घेतला’ अशा भावना शिंदे यांनी बोलून दाखवल्या. (Jyotiraditya Scindia enters BJP)
Jyotiraditya Scindia: There have been 2 life changing events for me – one, the day I lost my father and the second, yesterday when I decided to choose a new path for my life…The Congress party is not anymore the party that it was earlier. pic.twitter.com/ZQDx8pC7wM
— ANI (@ANI) March 11, 2020
‘आमच्यासाठी हा आनंदचा क्षण आहे. राजमाता विजयाराजे शिंदे आमच्यासाठी आदर्श राहिल्या आहेत. ज्योतिरादित्य शिंदे हे भाजप कुटुंबाचे सदस्य आहेत. भाजप हा लोकशाही पक्ष असून आपल्याला मुख्य प्रवाहात काम करण्याची संधी मिळेल, अशी ग्वाही जे. पी. नड्डा यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांना दिली.
हेही वाचा : मध्य प्रदेशात ‘ऑपरेशन लोटस’, महाराष्ट्रात काय चाललंय? फडणवीसांचं मिश्किल उत्तर
ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर मध्य प्रदेशात राजकीय भूकंप झाला. शिंदेंसोबत 19 आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे अपक्षांच्या पाठिंब्याने चालणारं काँग्रेस सरकार अल्पमतात आलं आहे. आता ज्योतिरादित्यांनी भाजपची वाट धरल्यामुळे ‘कमलनाथ जाणार आणि ‘कमळ’ उमलणार’ असं चित्र आहे. (Jyotiraditya Scindia enters BJP)