निवडणुकीतला बाप (BAP) माणूस, ओबामांकडून घेतली प्रेरणा, विधानसभेत पोहोचण्यासाठी 350 किमी बाईक चालवली

| Updated on: Dec 07, 2023 | 9:25 PM

रघकुआन गावातील झोपडीत कमलेश्वर दोडियार यांचे कुटुंब राहते. वडिलांचे दोन्ही हात निकामी आहेत. तर, आई रोजंदारीवर काम करते. यापूर्वी त्याचे वडील राजस्थानमधील रतलाम जिल्ह्यात २५ किमी दूर अशा दुसऱ्या गावात राहत होते.

निवडणुकीतला बाप (BAP) माणूस, ओबामांकडून घेतली प्रेरणा, विधानसभेत पोहोचण्यासाठी 350 किमी बाईक चालवली
Madhya Pradesh election 2023
Follow us on

भोपाळ | 7 डिसेंबर 2023 : सडपातळ शरीर, उंची साडे पाच फूट, वय ३३ वर्षे, आदिवासी समाजासाठी लढणारा एक खोडकर मुलगा अशी काही दिवसांपूर्वी त्याची ओळख होती. त्याचा ना राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाशी संबंध किंवा ना प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेससोबत लागेबांध. निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी कमलेश्वर दोडियार याची ही ओळख होती. पण, मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर झाला. त्यानंतर कमलेश्वर दोडियार याची ओळख आता ‘आदरणीय आमदार श्री कमलेश्वर दोडियार’ अशी झालीय.

आमदार कमलेश्वर दोडियार यांचा जन्म राजस्थानमध्ये झाला. पण, त्यांनी मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील सैलाना मतदारसंघातून निवडणूक लढविली. काँग्रेस आमदार हर्ष गेहलोत यांचा त्यांनी ४ हजार ६१८ मतांनी पराभव केला आणि ते बाप माणूस ठरले. कारण, कमलेश्वर दोडियार यांनी भारत आदिवासी पक्षाचे (BAP) या पक्षातून उमेदवारी अर्ज भरला होता. मध्य प्रदेशात बापने आठ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यात कमलेश्वर दोडियार यांनी आपल्या पक्षाला विजय मिळवून दिलाय.

रघकुआन गावातील झोपडीत कमलेश्वर दोडियार यांचे कुटुंब राहते. वडिलांचे दोन्ही हात निकामी आहेत. तर, आई रोजंदारीवर काम करते. यापूर्वी त्याचे वडील राजस्थानमधील रतलाम जिल्ह्यात २५ किमी दूर अशा दुसऱ्या गावात राहत होते. मात्र गरिबीमुळे या कुटुंबाला त्यांची जागा सोडावी लागली. त्यामुळे ते आता इथे स्थायिक झाले आहेत.

२००८-०९ मध्ये बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. ती बातमी वाचून एक धडपडणारा माणूस अमेरिकेसारख्या देशाचा राष्ट्राध्यक्ष कसा होऊ शकतो असा पराश पडला. ते ही जेव्हा ओबामा कुटुंब केनिया सोडून अमेरिकेत स्थायिक झाले होते. याच ओबामांकडूनच मला प्रेरणा मिळाली असे आमदार कमलेश्वर दोडियार सांगतात.

निवडणूक जिंकल्यानंतर कमलेश्वर दोडियार यांना भोपाळ येथे विधानसभा सचिवालयात विजयी उमेदवाराची कागदपत्रे जमा करण्यासाठी बोलावण्यात आले. थंडीचा मोसम असतानाही कमलेश्वर दोडियार यांनी 350 किमीचे अंतर 8 ते 9 तासांत बाईकवरून कापले आणि कागदपत्रे जमा केली.

निवडणुकीसाठी 12 लाख इतके कर्ज काढले. कार्यकर्त्यांनी निवडणुकीत सर्वतोपरी मदत केली. दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने दिली. आता निवडणुकीच्या प्रचारानंतर सगळेच थकले आहेत. त्यामुळे मला त्यांच्या गाड्या वापरायच्या नव्हत्या. याशिवाय विधानसभा सचिवालयातूनही कागदपत्रे जमा करण्यासाठी फोन केले जात होते. त्यामुळे वेळ न घालवता माझ्या पत्नीच्या भावाच्या बाईकवरून भोपाळला गेलो, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे हा सर्व प्रवास त्यांनी हेल्मेट न घालता केला. आत्ताच खूप खर्च झाला आहे. एक चांगले हेल्मेट घेण्यासाठी आमच्याकडे इतके पैसे नव्हते. आता लवकरच नवीन हेल्मेट खरेदी करणार आहे असेही ते म्हणाले.

राजकारणात कसे आले?

उज्जैनमधून पदवीचे शिक्षण पूर्ण करत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) संपर्कात आले. पहिल्याच वर्षी आरएसएसचे सुशिक्षित स्वयंसेवक बनले. संघ प्रचारकांची मदत घेत त्यांनी पुढील अभ्यासासाठी दिल्ली गाठली. मात्र, तेथे त्यांना आरएसएस मदत मिळू शकली नाही. ते इतर संघटनांच्या संपर्कात आले आणि आंदोलनात सहभागी होऊ लागले.

2017 मध्ये दिल्लीहून परतल्यानंतर कमलेश्वर यांनी जय युवा आदिवासी शक्ती संघटनेत काम सुरु केले. 2018 मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवली. पहिल्या निवडणुकीत केवळ 10 हजार मते मिळवण्याचे त्यांचे लक्ष्य होते. मात्र, त्यांना 18 हजार 800 मते मिळाली. यामुळे त्यांचे धैर्य वाढले आणि त्यानंतर त्यांनी राजस्थानमध्ये स्थापन केलेल्या भारत ट्रायबल पार्टी (BTP) च्या तिकिटावर रतलाम मतदारसंघातून 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. यंदा मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भारत ट्रायबल पार्टीमध्ये फुट पडली. भारत आदिवासी पक्ष (BAP) हा नवीन पक्ष उदयास आला. याच भारत आदिवासी पक्षातून कमलेश्वर यांनी निवडणूक लढविली आणि 71 हजार 219 मते मिळवून ती जिंकलीही.