मॅगसेसे पुरस्कार विजेता 3 इडियट्सच्या आयकॉनिक हिरोचे उपोषण, मोदी सरकारवर केला गंभीर आरोप
आमिर खान याच्या 'थ्री इडियट्स' चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा लडाखमधील प्रसिद्ध अभियंता आणि शोधक सोनम वांगचुक यांच्यावर आधारित होती. तेच सोनम वांगचुक उपोषणाला बसले आहेत. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केलाय.
नवी दिल्ली | 10 मार्च 2024 : आमिर खान याच्या ‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. चित्रपटातील फुन्सुक वांगडू यांची भूमिका ज्या व्यक्तिरेखेवर आधारित होती ते मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या उपोषणात जवळपास 30 हजार लोक सामील झाले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. जर भाजप सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर पुढील 21 दिवस उपोषण सुरु राहिलं असा इशाराही त्यांनी दिलाय.
भाजप केवळ दिखाव्यासाठी रामभक्त असल्याचा दावा करत आहे. केंद्रातील भाजप सरकार खरोखरच रामाची पूजा करत असेल तर त्यांनी लडाखला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करावीत असे आवाहन सोनम वांगचुक यांनी केले आहे. रघू कुळाची परंपरा नेहमीच सत्याची आहे. जीवन गमावले जाऊ शकते परंतु शब्द गमावू शकत नाहीत. त्यामुळे केंद्र सरकार लडाखबाबत दिलेले आश्वासन पूर्ण करत नाही तोपर्यंत उपोषण 21 दिवस सुरू राहणार आहे असे ते म्हणाले.
सोनम वांगचुक यांनी लडाखच्या लोकांच्या मागणीच्या समर्थनार्थ 21 दिवसांच्या उपोषणाची घोषणा केली आहे. केंद्र सरकारसोबत त्यांची चौथी चर्चा निष्फळ ठरली त्यानंतर त्यांनी हे उपोषणाचे पाऊल उचलले.
काय आहेत मागण्या?
5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरचे विभाजन झाल्यापासून लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याशिवाय राज्यघटनेची सहावी अनुसूची लागू करण्याची मागणी आहे. यासोबतच पीएससी आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणासह अन्य मागण्यांबाबत आंदोलन करण्यात येत आहे. सोनम वांगचुक यांच्यासह लडाखमधील अनेक लोकांनी आतापर्यंत केंद्र सरकारने कोणतीही मागणी पूर्ण करण्यासाठी ठोस पुढाकार घेतला नाही, असा आरोप केला आहे.
नजरकैदेत ठेवण्यात आले
सोनम वांगचुक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना टॅग करत एक ट्विटही केले आहे. यात त्यांनी ‘मी फक्त उपोषण करतोय. पर्यावरण वाचवण्यासाठी प्रार्थना करतोय. तरीही केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासन मला त्रास देत आहेत. मी महिनाभर कोणतेही वक्तव्य करू नये, अशी त्यांची इच्छा आहे. कोणत्याही जाहीर सभेत सहभागी होऊ नका असे प्रशासन सांगत आहे. शेवटी, हे कितपत योग्य आहे? असा सवाल त्यांनी केला आहे. मला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. प्रत्यक्षात त्यांची स्थिती नजरकैदेपेक्षा वाईट आहे. सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरु असलेल्या ठिकाणी उणे 40 अंश तापमान आहे. पाणी हातात घेण्यापूर्वीच त्याचे बर्फ होते. त्यामुळे येथेच मला अडकविण्याचा प्रशासनाचा डाव आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
पंतप्रधान मोदी यांना लडाख आणि इतर हिमालयीन प्रदेशांना औद्योगिक शोषणापासून वाचवण्याची विनंती करतो. कारण, त्याचा लडाखच्या लोकांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होईल. लडाखमधील पाणीटंचाईसारख्या गंभीर समस्याही त्यांनी मांडल्या आहेत. लडाखमध्ये पाण्याची एवढी टंचाई आहे की लोक 5 लिटर पाण्यावर दिवस घालवतात. अनेक स्थलांतर करत आहेत. अशा परिस्थितीत विकास प्रकल्पांच्या नावाखाली लडाखच्या पर्यावरणाशी खेळ होत राहिला. येथे उद्योग उभे राहिले. खाणकाम होत राहिले तर धूळ आणि धुरामुळे हिमनद्या नष्ट होतील अशी भीतीही त्यांनी व्यक्त केलीय.
कोण आहेत सोनम वांगचुक?
56 वर्षीय सोनम वांगचुक हे मेकॅनिकल इंजिनियर आणि हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह, लडाख (HIAL) चे संचालक आहेत. 2018 मध्ये त्यांना प्रतिष्ठित मॅगसेसे पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. 2009 मधील सुपरहिट चित्रपट ‘3 इडियट्स’ ची मुख्य व्यक्तिरेखा फुन्सुक वांगडू प्रत्यक्षात वांगचुककडून प्रेरित होती