हर्षवर्धन पाटील तिकीटासाठी मागे : महादेव जानकर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी मागे लागले आहेत, असा दावा पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी इंदापुरात केला आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटीलही भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना जोर आला आहे.
इंदापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील माझ्याकडे तिकीट मागायला येत आहेत, असा गौप्यस्फोट पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केला आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. हर्षवर्धन पाटील आगामी विधानसभा निवडणूक कोणत्या पक्षातून लढणार याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगवेगळे लढले होते. इंदापूर विधानसभा मतदारसंघात हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराकडून पराभव झाला होता.
हर्षवर्धन पाटील यांनी काहीच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट घेतली होती. त्यामुळे पाटील भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं.
विधानसभेला तरी राष्ट्रवादी इंदापूरची जागा सोडेल, या आशेवर हर्षवर्धन पाटील यांनी लोकसभेत इंदापुरातून सुप्रिया सुळेंना मोठी लीड मिळवून दिली. पण आघाडी झाल्यानंतरही शरद पवारांनी त्याच हर्षवर्धन पाटलांना अजूनही गॅसवर ठेवल्यामुळे पाटलांची चलबिचल होताना दिसत आहे.
इंदापूरमधून आघाडीची उमेदवारी मिळाली नाही तर हर्षवर्धन पाटील मोठा राजकीय भूकंप घडवून आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
धनगर समाजाला आरक्षण मीच देणार; पण जरा वेळ लागेल
धनगर समाजाचे आरक्षण हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असल्यामुळे राज्य सरकारला याची घोषणा करता येत नाही. मात्र तरीही राज्य सरकार धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. या प्रक्रियेसाठी थोडा वेळ लागणार असल्याने धनगर समाजाने संयम बाळगावा, असं आवाहन महादेव जानकर यांनी केलं. इंदापूर तालुक्यातल्या चारा छावण्यांना महादेव जानकर यांनी भेट देऊन पाहणी केली.
सरकारने धनगर समाजाला एक हजार कोटी रुपयांच्या निधीसह विविध योजना लागू केल्या आहेत. दलित, बारटी आदिवासी, शबरी आणि मराठा समाजासाठी ज्याप्रमाणे सारथी ही संस्था काम करते, त्याचप्रमाणे भटक्या-विमुक्तांना आणि ओबीसी समाजाला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी महाज्योती या संस्थेची निर्मिती केली आहे, असं जानकरांनी सांगितलं. या संस्थेच्या माध्यमातून भटके विमुक्त आणि ओबीसींना आर्थिक सक्षम करत असल्याचं जानकरांनी सांगितलं.
भाजपच्या मेगाभरतीनंतर रासप जागा मागणार
भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरु असल्यामुळे भाजप आणि शिवसेनेचं भांडण मिटल्यानंतर युतीमधील घटकपक्षांना राहिलेल्या जागा मागणार आहोत. रासपने 52 जागांची मागणी केली असून त्यामध्ये दौंड आणि इंदापूरची जागा प्रामुख्याने मागितली असल्याचं त्यांनी सांगितलं.
जोपर्यंत चाऱ्याची उपलब्धता होत नाही, तोपर्यंत चारा छावण्या बंद करणार नाही, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी पशुसंवर्धन मंत्री म्हणून दिलेले आहेत. आता पाऊस पडला तरीही चारा निर्माण होण्यासाठी दोन ते तीन महिने लागणार आहेत. ही अडचण समजून चारा छावण्यांना दोन ते तीन महिने जास्तीचा कालावधी दिला आहे, असंही जानकर यांनी सांगितलं.
पशुखाद्याचा प्रश्न दोन दिवसात मार्गी
लष्करी आळीमुळे प्रमुख कोंबडी खाद्य असलेल्या मक्याची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे पशुखाद्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी महादेव जानकर यांनी एफडीआयला पत्र दिलेलं आहे. गहू, तांदूळ, मका या शासनाच्या गोदामात पडून असल्याने आम्हाला शासकीय दराने विकत मिळण्याबाबत कळवलं आहे. यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते. दोन दिवसात या परवानगीबाबत आम्हाला कळवणार असून तातडीने पशुखाद्याचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं महादेव जानकर यांनी सांगितलं.