राज्यात ओल्या दुष्काळाचं संकट, पण आमदारांना परदेश दौरा जास्त महत्त्वाचा! पडळकर, मिटकरींसह 16 आमदार इस्रायल, दुबई दौऱ्यावर, कारण काय?
राज्यात एकीकडे ओला दुष्काळ आहे. शेतकरी पुरामुळे झालेल्या नुकसानामुळे मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांना कितपत मदत सरकार दरबारी मिळाली, यावरुन अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. अशातच एक दुसऱ्यांविरोधात टोकाची टीका करणारे आमदार आता एकत्रच अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने परदेशवारी करणार आहेत.
नागपूर : महाराष्ट्राचे सर्वपक्षीय 16 आमदार (Maharashtra All party MLA) हे इस्रायल आणि दुबई दौऱ्यावर जाणार आहेत. राज्यातील सर्वपक्षीय 16 आमदारांचा हा अभ्यास दौरा (MLA Study Tour) असल्याची माहिती मिळतेय. 16 ते 25 सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय आमदार अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे विधानसभेत ज्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना ’50 खोके-50 खोके’ म्हणून घोषण देत डिवचलं होतं, त्यांच्याच मांडीला मांडी लावून हा दौरा सत्ताधारी आणि विरोधक (Opposition) करणार आहेच. विशेष म्हणजे राज्यात ओल्या दुष्काळाच्या संकटाने शेतकऱ्यांना घेरलेलं आहे. अशाच काळात अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने होणारी आमदारांची परदेश वारी चर्चेचा विषय ठरतेय.
..म्हणून 2 वर्ष दौरा नाही!
कोरोना महामारीमुळे आमदारांचा परदेश दौरा होऊ शकला नव्हता. आता कोरोनाचं संकट काही बाजूला सरलं आहे. अशात दोन वर्षांनंतर सगळ्या गोष्टी पूर्ण क्षमतेनं सुरु झाल्यामुळे त्यात आमदारांचा अभ्यास दौरा तरी फार काळ मागे कसा राहणार? अखेर या अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने 16 आमदार इस्रायल आणि दुबई दौऱ्यावर जणार आहेत.
या दौऱ्यासाठी मुहूर्तही निश्चित करण्यात आला आहे. एकूण 9 दिवसांच्या परदेश दौऱ्याचं नियोजन करण्यात आलं आहे. या दौऱ्यासाठी सर्वपक्षीय आमदारांची निवड करण्यात आली आहे. त्यात नेमका कुणाकुणाचा समावेश आहे, याची एक्स्क्लुझिव्ह यादी देखील टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहे.
मिटकरी काय म्हणाले?
या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जेव्हा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना विचारण्यात आली, तेव्हा त्यांनी या दौऱ्याचा खर्च शिंदे सरकारने केल्याचं म्हटलंय. शिवाय मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. अभ्यास दौऱ्यात मला कळेल. पण या खोके वाल्यांना काय कळणार, असं म्हणत टोलाही हाणलाय. अमोल मिटकरी यांनी नेमकी काय म्हटलंय, पाहा व्हिडीओ :
परदेश दौऱ्यावर जाणाऱ्या आमदारांची एक यादी समोर आली आहे. या यादीमध्ये कुणाकुणाची नावं आहेत, त्यावर एक नजर टाकुयात…
- प्रशांत बंब
- सुरेश भोले
- मेघना बोर्डीकर
- यामिनी जाधव
- सदा सरवणकर
- राजेंद्र यड्रावरकर
- कैलाश घाटगे पाटील
- अनिल पाटील
- चंद्रकांत नवघारे
- यशवंत माने
- संग्राम थोपटे
- मोहनराव हंबर्डे
- गोपीचंद पडळकर
- अमोल मिटकरी
- अभिजीत वंजारी
- श्वेता महाले
विधान परिषद आणि विधान सभेच्या सचिवदेखील या अभ्यास दौऱ्यासाठी जाणार आहे. समोर आलेल्या यादी नुसार 17 सप्टेंबरपासून या दौऱ्याची सुरुवात होईल. तर 25 सप्टेंबरपर्यंत हा दौरा चालेल.
राज्यात एकीकडे ओला दुष्काळ आहे. शेतकरी पुरामुळे झालेल्या नुकसानामुळे मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांना कितपत मदत सरकार दरबारी मिळाली, यावरुन अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. अशातच एक दुसऱ्यांविरोधात टोकाची टीका करणारे आमदार आता एकत्रच अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने परदेशवारी करणार आहेत. या भाचपचे पाच आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आमदार, काँग्रेस तीन आणि शिंदे गटाचे एकूण चार आमदारांचा समावेश करण्यात आला आहे.