Video | दादा तर शिवसेनेचे प्रवक्तेच झालेत… पण ती पण संधी गेली.. विधानसभेत मुख्यमंत्र्यांची चौफेर फटकेबाजी
सरकार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करतं, असा आरोप केला जातो.यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना घेरलं. ते म्हणाले, दादा तुम्ही बोलतात गोड. पण तुमचा कार्यक्रम सुरु असतो. त्यामुळे असे पोटदुखीचे प्रसंग वारंवार येतील.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज विधानसभेतील भाषणात पहाटेचा शपथविधी, महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांचे फेसबुक लाइव्ह, राष्ट्रवादी काँग्रेसकडून भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स आदी विषयांवरून चौफेर फटकेबाजी केली. तर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर हास्य-विनोदातून निशाणाही साधला. बोलता बोलता पहाटेच्या शपथविधीच्या वेळी मला किती धक्का बसला, तेही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तर अजित पवार यांना धारेवर धरत तुम्ही आता शिवसेनेचं प्रवक्तेपदत घेऊन टाका, अशी मिश्किल टोलेबाजीही केली.
काय काय घडलं?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यामुळे मला धक्का बसला. राज्यपाल कोश्यारीही अवाक झाले. असा उल्लेख अजित पवार यांनी भाषणात केला. यावरून एकनाथ शिंदे यांनी तुफान फटकेबाजी केली. ते म्हणाले, पहाटेच्या शपथविधी वेळी पण तुम्हीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मी सकाळी टीव्ही लावला तेव्हा मला वाटलं हे मागचं आहे. मग कुणीतरी बोललं हे मागचं नाही, आताचच आहे. जयंतरावांना फोन करत होतो. ते उचलत नव्हते. ते बोलले जयंतरावही तिथेच होते. तो माझ्यासाठी मोठा शॉक होता. त्यातल्या सुरसकथा हळू हळू बाहेर येत आहेत. त्या देवेंद्र फडणवीस यांनी अजून स्पष्ट केलेल्या नाहीत. त्यांनीही अर्धच सांगितलं आहे. ते जेव्हा पूर्ण सांगतील, तेव्हा सगळ्यांना मोठा शॉक बसेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
भावी मुख्यमंत्री
भावी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे बॅनर लागत आहेत. यावरूनही शिंदे म्हणाले, एकदा ते ठरवा, कोण होईल नेमकं. गेल्या सहा महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर चहापान्याचा खर्च २ कोटींच्या घरात झाला. यावरून अजित पवार यांनी आरोप केले. यावरून एकनाथ शिंदे यांनी प्रतिसवाल केला. पण कोरोना काळात वर्षा बंगल्यावर माणसं नसताना, फेसबुक लाइव्ह असताना किती खर्च आला, हे तुम्ही पाहिलं नाही का?..
पोटदुखीचे प्रसंग आता वारंवार येतील…
सरकार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करतं, असा आरोप केला जातो.यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना घेरलं. ते म्हणाले, दादा तुम्ही बोलतात गोड. पण तुमचा कार्यक्रम सुरु असतो. त्यामुळे असे पोटदुखीचे प्रसंग वारंवार येतील. आम्ही त्यासाठी जालीम औषध ठेवलंय. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबा ठाकरे आपला दवाखाना सुरु केला आहे.
दादांना शिवसेना प्रवक्ते पद द्यावं…
अजित पवार तर शिवसेनेचे प्रवक्ते झाल्यासारखेच बोलतात, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. ते म्हणाले, दादांना फक्त पदच द्यायचं बाकी आहे. यावर फडणवीस म्हणाले, सहशिवसेना प्रमुख. एकनाथ शिंदे यांनी लगेच पुढची टिप्पणी केली. आता सह शिवसेनाप्रमुखही होता येत नाही. कारण शिवसेना आपली आहे. तीही संधी गेली.