टीव्ही 9 मराठीचा सर्वात मोठा पोल, महाराष्ट्रात लाट कुणाची?
महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेऊन, टीव्ही 9 मराठीने महाराष्ट्राच्या मनात काय (TV9 Marathi Poll) हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप-शिवसेना युतीचीच लाट दिसत आहे.
TV9 Marathi Poll मुंबई : निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची (Poll dates Maharashtra) घोषणा केली. महाराष्ट्रातील 288 जागांसाठी (TV9 Marathi Poll) एकाच टप्प्यात 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे, तर महाराष्ट्राचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी असेल.
लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांनी मिळून विरोधकांची धूळदाण उडवली. भाजपने 303 तर एनडीएने तब्बल 352 जागांवर विजय मिळवला. दुसरीकडे काँग्रेसला 52 आणि यूपीएला मिळून 87 तर इतरांना 103 जागा मिळाल्या. तेव्हापासून महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली. महाराष्ट्रात जर आज निवडणुका झाल्या तर कुणाचं पारडं जड हे टीव्ही 9 मराठीने जाणून घेतलं.
महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेऊन, टीव्ही 9 मराठीने महाराष्ट्राच्या मनात काय (TV9 Marathi Poll) हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप-शिवसेना युतीचीच लाट दिसत आहे. आज निवडणूक झाल्यास महाराष्ट्रात पुन्हा भाजप-शिवसेना युतीचीच सत्ता येण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 पैकी 217 जागा भाजप-शिवसेना युतीला मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीला केवळ 60 आणि अपक्ष/इतर पक्षांना 11 जागा मिळण्याचे संकेत आहेत.
2019 लोकसभा निवडणुकीच्या निकालांमधून विधानसभा मतदारसंघांमधील जे कल उघड झाले होते, ते आणि सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीचं विश्लेषण करून टीव्ही 9 च्या पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांच्या टीमनं विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा अंदाज व्यक्त केलाय.
विदर्भ
विदर्भामध्ये लोकसभेच्या 10 आणि विधानसभेच्या 62 जागा आहेत. लोकसभेच्या दहा जागांपैकी भाजप आणि शिवसेना युतीनं 8 जागांवर दणदणीत विजय मिळवत विदर्भावरचं वर्चस्व कायम राखलं. अमरावतीमध्ये अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे दिग्गज खासदार आनंदराव अडसूळ यांना आसमान दाखवलं तर चंद्रपूरमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिरांना शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेल्या बाळा धानोरकरांनी पाणी पाजलं.
विधानसभेला काय होऊ शकतं?
विधानसभेसाठी विदर्भात आज निवडणुका झाल्यात तर 62 पैकी महायुतीला तब्बल 51 जागा मिळू शकतात. तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला केवळ 11 जागांवर समाधान मानावं लागू शकतं. इथे 12 जागांवर काँटे की टक्कर दिसेल. तिथे वंचित फॅक्टर पाहायला मिळू शकतो.
महाराष्ट्राचा महापोल विदर्भाचं चित्र कसं असू शकतं?
- एकूण जागा – 62
- महायुती – 51
- महाआघाडी – 11
मराठवाडा
मराठवाड्यात महायुतीला 39 जागांचा अंदाज
- मराठवाड्यात आघाडीला फक्त 6 जागांचा अंदाज
- मराठवाड्यात एमआयएमला 2 जागा, अपक्ष 1
- वंचित आघाडी 18 ठिकाणी प्रभावी
- मराठवाड्यात 18 जागांवर वंचित फॅक्टर प्रभावी
- मराठवाड्यात महायुतीचा बोलबाला
- वंचितला सोबत घेतलं तरच आघाडी तरणार
पश्चिम महाराष्ट्रात एकूण जागा – 68
- पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 44 जागांचा अंदाज
- पश्चिम महाराष्ट्रात आघाडीला फक्त 24 जागांचा अंदाज
- वंचित आघाडी 8 ठिकाणी प्रभावी
- सांगलीसह सोलापूरमध्ये वंचित फॅक्टर
- पश्चिम महाराष्ट्रात 8 जागांवर वंचित फॅक्टर प्रभावी
ठाणे आणि कोकण एकूण जागा 39
- कोकणात महायुतीला 27 जागांचा अंदाज
- आघाडीला फक्त 6 जागा, शेकाप 2
- बहुजन विकास आघाडीला 3 जागांचा अंदाज
- स्वाभिमानी महाराष्ट्र पक्षाला 1 जागा
- 18 जागांवर वंचित फॅक्टर प्रभावी
- वंचितला सोबत घेतलं तरच आघाडी तरणार
- कोकणात काही ठिकाणी वंचित फॅक्टरचा प्रभाव
मुंबईकरांच्या मनात काय? – एकूण जागा – 36
- मुंबईत महायुतीला 30 जागांचा अंदाज
- मुंबईत आघाडीला फक्त 5 जागा मिळण्याची शक्यता
- मुंबईत 36 पैकी 1 जागा अपक्षला
- मुंबईत शिवसेनेच्या 2 जागा धोक्यात
- मुंबईत काँग्रेसच्या 3 जागा धोक्यात
- मुंबईत मोठा भाऊ भाजपा, छोटा भाऊ शिवसेना
- मुंबईत भाजपाच्या 17 जागा, शिवसेनेच्या 13 जागा