यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात विधानसभेच्या 7 जागा आहेत. यामध्ये 5 भाजपकडे, एक शिवसेना आणि एक राष्ट्रवादीकडे आहे. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय भेटीगाठी सुरु आहेत. जिल्ह्यात भाजप विकास कामावर मतं मागत आहेत, तर विरोधीपक्ष भाजपच्या कारभारावर. 7 विधानसभा असलेला यवतमाळ जिल्हा कापूस उत्पादक शेतकऱ्याचा जिल्हा आहे. हा जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचाच बोलबाला होता. अनेक दिग्ग्ज नेते या जिल्ह्याने दिले. शिवाय दोनवेळा मुख्यमंत्रीपद नाईक घराण्याच्या रूपाने यवतमाळ जिल्ह्याला मिळाले. मात्र 2014 मधील निवडणुकीत जिल्ह्यातील काँग्रेस भुईसपाट झाली.
जिल्ह्यातील यवतमाळ, वणी, राळेगाव, उमरखेड आणि आर्णी या 5 ठिकणी भाजपचे, तर दिग्रसमध्ये शिवसेना आणि पुसदमध्ये राष्ट्रवादी असे पक्षीय बलाबल आहे.
यवमाळ विधानसभा मतदारसंघ (Yavatmal Vidhansabha)
यवतमाळ विधानसभेचा विचार केला तर पालकमंत्री मदन येरावार यांचा हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात मागील निवडणुकीत सर्व पक्ष वेगवेगळे लढल्याने तिरंगी लढत झाली होती. त्यावेळी अवघ्या 1227 मतांच्या फरकाने भाजपचे मदन येरावार विजयी झाले. त्यांना 53 हजार 671 मते मिळाली होती. त्यावेळी त्यांना शिवसेनेच्या संतोष ढवळे यांनी जबरदस्त टक्कर दिली होती. तर बसपकडून निवडणूक लढविलेले तारिक लोखंडवाला तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांचे चिरंजीव राहुल ठाकरे हे तब्बल चौथ्या क्रमांकावर होते.
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता बसपाकडून निवडणूक लढविलेले तारिक लोखंडवाला हे राष्ट्रवादीच्या गटात सामील झाले असून, ते यवतमाळ विधानसभेसाठी इच्छुक आहेत. तर माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते संदीप बाजोरिया हे सुद्धा इच्छुक आहेत.
काँग्रेसकडून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर हे प्रबळ दावेदार आहेत. मात्र या मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावा केला आहे.
तिकडे बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून विपीन चौधरी या नवख्या तरुणाला उमेदवारी देण्याची तयारी केली आहे.
वणी विधानसभा मतदारसंघ (Wani Assembly )
जिल्ह्यातील दुसरा महत्वाचा मतदारसंघ म्हणून वणी विधानसभेकडे पाहिलं जातं. ब्लॅक डायमंड सिटी असलेल्या वणी विधानसभा मतदारसंघात भाजपचे संजीव रेड्डी बोदकुलवार हे विद्यमान आमदार आहेत. मागील निडणुकीत 45 हजार मते घेऊन 5 हजाराच्या मताधिक्याने ते विजयी झाले. त्यांनी शिवसेनेच्या विश्वास नांदेकर यांचा पराभव केला होता. काँग्रेसचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता.
या मतदारसंघात मनसेचीही ताकद आहे. मनसेचे राजू उंबरकर विधानसभेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. हा मतदारसंघ आधी काँग्रेसचा गड होता, त्यानंतर शिवसेनेच्या हाती गेला. मग 2014 च्या निवडणुकीत भाजपने इथे विजय मिळवला. आता 2019 मध्ये भाजप-शिवसेनेच्या युतीत हा मतदारसंघ कोणाच्या वाटेला जातो, त्यानुसार या ठिकाणची राजकीय परिस्थिती अवलंबून आहे.
दिग्रस विधानसभा (Digras Vidhan sabha constituency)
या मतदारसंघात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड विद्यमान आमदार आहेत. दिग्रस विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचे नेते माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा मतदारसंघ होता. मात्र 15 वर्षांपासून हा मतदारसंघ सेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा हा मतदारसंघ आहे. मागील निवडणुकीत संजय राठोड यांना 1 लाख 21 हजार मते मिळाली होती. त्यांच्या विरोधातील वसंत घुईखेडकर हे 41 हजार 352 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले. संजय राठोड यांचं मताधिक्य 80 हजार इतकं होतं.
या मतदारसंघात बंजारा समाज मोठ्याप्रमाणात आहे. सध्या तरी संजय राठोड यांच्याविरोधात विरोधी पक्षाकडे प्रबळ दावेदार नसल्याचे चित्र आहे.
राळेगाव विधानसभा (Ralegaon vidhan sabha constituency)
राळेगाव विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे विद्यमान कॅबिनेट मंत्री अशोक उईके हे प्रतिनिधीत्व करतात. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेस नेते माजी मंत्री वसंत पुरके यांचा पराभव केला. आता पुरके यांनी उईकेंकडून मतदारसंघ पुन्हा जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र उईकेंच्या वाढत्या आलेखाने काँग्रेसला निवडणूक सोपी नाही असे चित्र सध्या या मतदारसंघात आहे.
पुसद विधानसभा (Pusad Vidhan sabha)
नाईक घराण्याचे कायम प्राबल्य असलेल्या पुसद विधानसभा मतदारसंघात कायम नाईक परिवाराची सत्ता आहे. राष्ट्रवादीचे मनोहर नाईक हे विद्यमान आमदार आहेत. सध्या याच नाईक परिवाराच्या शिवबंधन बांधण्याच्या हालचाली सुरु आहेत. नाईक म्हणजे पुसद आणि पुसद म्हणजे नाईक असे समीकरण इथे पाहायला मिळतं. नाईकांनी जर पक्षांतर केलं, तर या ठिकाणी विरोधीपक्ष आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी कोणाला उमेदवारी देतात हे पाहणे महत्वाचे आहे.
आर्णी विधानसभा (Arni Assembly)
आर्णी विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे राजू तोडसाम विद्यमान आमदार आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचा पराभव केला होता. भाजपने या मतदारसंघात झेंडा रोवला, मात्र भाजप आमदार तोडसाम यांच्या व्यक्तिगत काही प्रकरणांमुळे त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे. मात्र काँग्रेसला तोडसाम यांचा पराभव करणे कठीण आहे. आदिवासी राखीव या मतदारसंघात भाजप पुन्हा निवडून येते की काँग्रेस बाजी मारेल, हे निवडणूक निकाला नंतरच स्पष्ट होईल. मात्र या मतदारसंघात काट्याची लढत होण्याची शक्यता आहे.
उमरखेड विधानसभा (Umarkhed vidhan sabha)
उमरखेड विधानसभा मतदारसंघात भाजपचे राजेंद्र नजरधने विद्यमान आमदार आहेत. येत्या निवडणुकीत त्यांच्यासमोर काँग्रेसचे माजी आमदार विजय खडसे यांनी आव्हान उभे केले आहे. या मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे एकदा निवडून आलेला आमदार पुन्हा निवडून येत नाही.
प्रत्येकवेळी भाकरी परतल्याचे उदाहरण या मतदारसंघात पाहायला मिळते. मात्र यंदा हा विक्रम मोडणार की कायम राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.