LIVE : अजित पवार म्हणाले, राजीनाम्यापूर्वीच शपथ कशी, मुख्यमंत्र्यांनी नियम सांगितला
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. सत्ताधारी देवेंद्र फडणवीस सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे.
Maharashtra assembly Monsoon session मुंबई : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. सत्ताधारी देवेंद्र फडणवीस सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत, सत्ताधाऱ्यांचं स्वागत केलं. विरोधकांनी भाजपकडून मंत्रिपद मिळालेल्या माजी विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना टार्गेट केलं. आयाराम, गयाराम जय श्रीराम, अशी घोषणा देत विखेंना विरोधी आमदारांनी टोले लगावले. विधानभवन परिसरात अधिवेशनासाठी सर्व आमदार आणि मंत्र्याचे आगमन झाले, त्यावेळी विरोधकांनी घोषणाबाजीने त्यांचं स्वागत केलं.
यंदाच्या अधिवेशनामध्ये भाजपा सरकार पाऊस, दुष्काळ यावर चर्चा करणार आहे, अशी माहिती मंत्री विनोद तावडे यांनी दिली. कालच राज्य मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. नव्या मंत्र्यांनीही आज अधिवेशनाला हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या मंत्र्यांची आणि त्यांच्या खात्याची माहिती सभागृहाला दिली.
दरम्यान, विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांचं नाव सुचवलं, त्याला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही अनुमोदन दिलं.
राजीनाम्यापूर्वी शपथ कशी? – अजित पवार
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारात सत्ताधाऱ्यांनी अन्य पक्षातून आलेल्या आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. त्याला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आक्षेप घेतला. अजित पवार म्हणाले, “कोणालाही कोणत्याही पक्षातून निवडून येऊन मंत्री होण्याचा अधिकार होण्याचा अधिकार आहे. पण निवडून न येताना, कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसताना मंत्रिपदाची शपथ घेता येत नाही असा नियम आहे. त्याबाबतचा नियम तपासून मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला माहिती द्यावी”
मुख्यमंत्री म्हणाले, “असा कोणताही कायदा नाही. भारतीय कायद्याने कोणीही पात्र व्यक्ती असेल, पण तो कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल, तरीही तो 6 महिने मंत्रीपदी राहू शकतो. दुसऱ्या पक्षात राहून सत्ताधारी पक्षाचा मंत्री होता येत नाही, त्यांना राजीनामा द्यावा लागतो. त्याच टर्ममध्ये मंत्री होता येतं. याबाबतचे सर्व नियम तपासून मंत्र्यांना शपथ दिली”
हेमंत टकले, राष्ट्रवादी काँग्रेस
काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यात पळवाट काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसताना मंत्री करण्यात आलं. मागच्या वेळीही अशाच प्रकारे एक मंत्री बनवले होते. त्यांना मोठया प्रमाणावर विरोध झाला होता. आशा मंत्र्यांचं स्वागत तर कसं करायचं. शेवटच्या क्षणी सर्वांना खुश करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. नियमांचे पालन होत नाही, अशी टीका काँग्रेस आमदार हेमंत टकले यांनी केली.
महाराष्ट्रात पाणी आणि दुष्काळामुळे अनेक गावात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर काल (16 जून) विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी भाजपा सरकार जोरदार टीका केली.
धनंजय मुंडे म्हणाले, “राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. जनता होरपळत आहे. सरकार जलयुक्त शिवार योजना योग्य राबवली असं म्हणत आहे, पण सर्व खोटं आहे.” सरकारने सरसकट कर्जमाफी करावी. तसेच दुष्काळ निवारणाचे काम वेगाने करावं, अशी मागणी अधिवेशनात करणार असल्याचीही माहिती मुंडेंनी दिली. उद्धव ठाकरे यांनी उन्हाळी सुट्टी बाहेर काढली आणि आता त्यांना दुष्काळ दिसत असल्याचाही टोला मुंडेंनी लगावला.
मंत्रिमंडळ विस्तार
कालच (16 जून) राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यामध्ये भाजपच्या 8, शिवसेनेच्या 2 आणि रिपाइं-आठवले गटाच्या एका मंत्र्यांने मंत्रिपदाची शपथ घेतली. या 13 नव्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर करण्यात आले. या मंत्रिमंडळात काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना स्थान देण्यात आले आहे. मात्र या मंत्रिंमंडल विस्तारावरही विरोधकांनी टीका केली आहे.