Monsoon session: “महाजनसाहेब तुमच्यासारख्या अनुभवी मंत्र्याकडून आकड्यांची गल्लत नको!”, भास्कर जाधवांचा आक्रमक पवित्रा
कालपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झालंय.यात सत्ताधारी आपली बाजू मांडतं आहेत. तर दुसरीकडे विरोधक त्यांना जोरदार विरोध करत आहेत.
मुंबई : कालपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झालंय.यात सत्ताधारी आपली बाजू मांडतं आहेत. तर दुसरीकडे विरोधक त्यांना जोरदार विरोध करत आहेत. राज्यात नुकतंच मंत्रिमंडळ विस्तार झालाय. ग्रामविकास आणि वैद्यकीय शिक्षण खात्याची धुरा सांभाळणाऱ्या गिरीश महाजनांकडून आकडेवारीत चूक झाली. अन् मग रंगला भास्कर जाधव विरुद्ध गिरीश महाजन (Girish Mahajan) सामना… महाजनांकडून विधेयकाच क्रमांक चुकला अन् त्यावरून त्यांना टीकेला सामोरं जावं लागलं. “गिरीश महाजनसाहेब, तुमच्यासारख्या अनुभवी मंत्र्याकडून आकड्यांची गल्लत अपेक्षित नाहीये. त्यामुळे तुम्ही तरी किमान योग्य माहिती सभागृहात मांडावी, अशी अपेक्षा आहे”, असं भास्कर जाधव म्हणालेत. “हरकतीच्या मुद्याला काही महत्व आहे की नाही?” भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी महाजनांना सवाल विचारलाय.
नेमकं काय झालं?
विधिमंडळाचं कामकाज सुरू होतं. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सुधारणा विधेयक मांडताना गिरीश महाजन सभागृहात अनुपस्थित होते. विधानसभा अध्यक्षांनी विधेयक मांडायला सांगत असताना महाजन सभागृह सोडून बाहेर गेले. त्यामुळे विरोधकांनी गदारोळ केला. विरोधकांचा आवाज ऐकून महाजन सभागृहात परतले.
विधानसभा अध्यक्षांनी विधेयक क्रमांक 16 मांडण्यास सांगितलं. पण महाजन यांनी विधेयक क्रमांक 17 सभागृहात मांडलं. त्यावर विरोधकांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले. भास्कर जाधव यांनी महाजनांना काही प्रश्न विचारले. पण भास्करराव तुम्ही औचित्याचा मुद्दा उपस्थित केलाय. पण आपण आता पुढे गेलो आहोत, असं अध्यक्षांनी म्हटलं. त्यावर आम्ही हरकतीचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्याला काही महत्त्व नाही का? असंच कामकाज रेटणार आहात का?, असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय.विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेच्या कामकाजावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरल्याचं पाहायला मिळालं. गिरीश महाजन यांनी सभागृह सोडून बाहेर गेले अन् परतल्यावर त्यांच्याकडून विधेयकाचा क्रमांक चुकला त्यावरून विरोधकांनी गदारोळ केला. गिरीष महाजन यांच्यासारख्या अनुभवी मंत्र्यांकडून अश्या चुकीची अपेक्षा नव्हती. त्यांची तयारी झालेली नव्हती का? असे प्रश्न विरोधकांकडून विचारण्यात आले.
आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. पहिला दिवस चांगलाच वादळी ठरला. विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. नव्या सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अधिवेशनामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगताना पहायला मिळालं. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नव्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र त्यानंतर दुपारी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आल. दरम्यान आजचा दिवस देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांना विविध प्रश्नांवरून कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.