महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा क्षण, ठाकरे आणि शिंदे गटाचे आमदार आमनेसामने, काय घडलं?

| Updated on: Dec 07, 2023 | 7:31 PM

महाराष्ट्राच्या राजकारणातील आज अतिशय महत्त्वाची घटना घडली. शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांवर सडकूना टीका-टीप्पणी केली जाते. दोन्ही गटाचे कार्यकर्ते अनेकवेळा आमनेसामने आले आहेत. असं असताना आज दोन्ही गटाचे आमदार नागपुरात विधान भवनाबाहेर एकत्र माध्यमांना प्रतिक्रिया देताना दिसले.

महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा क्षण, ठाकरे आणि शिंदे गटाचे आमदार आमनेसामने, काय घडलं?
Follow us on

नागपूर | 7 डिसेंबर 2023 : शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या एक दिवसआधी मुंबईच्या शिवाजी पार्क येथे ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर दोन्ही गटाच्या समर्थकांमध्ये मोठा राडा झाला होता. हा राडा इतका मोठा होता की पोलिसांना देखील आवरणं कठीण जात होतं. त्यानंतर आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शिवसेनेच्या दोन्ही गटाचे आमदार समोरासमोर आले. पण यावेळी दोन्ही गटाच्या नेत्यांनी सौजन्य पाळलं. पण तरीही दोन्ही गटाच्या नेत्यांनी एकमेकांना मिश्किल टोले, टोमणे लगावले. यावेळी त्यांच्यात झालेलं संभाषण हे सर्वसामान्य नागरिकांसाठी खरंच मनोरंजनात्मक आहे.

नागपुरात विधान भवनाच्या बाहेर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले, संजय शिरसाट आणि ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक समोरासमोर आले. विशेष म्हणजे तिथे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी देखील होते. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी या नेत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तीनही नेते योगायोगाने एकत्रितपणे विधान भवनात प्रवेश करत होते. यावेळी वैभव नाईक यांनी संधी साधत भरत गोगावले यांना टोला लगावण्याचा प्रयत्न केला. भरत गोगावले यांनी या अधिवेशनाला कोट घातला नाही, याचा अर्थ त्यांनी मंत्रिपदाची आशाच सोडलेली दिसतेय, असा टोला वैभव नाईक यांनी लगावला. त्यावर भरत गोगावले यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत उत्तर मिळेल असं सांगितलं.

यावेळी भरत गोगावले यांनी वैभव नाईक यांना थेट शिंदे गटात प्रवेश करण्याची ऑफर दिली. इतके दिवस मी कुणीतरी येणार म्हणून मंत्रीपदासाठी थांबलो. त्यामुळे वैभन नाईक येत असतील तर आपण पुन्हा थांबायला तयार आहोत, असा टोला भरत गोगावले यांनी यावेळी लगावला. यावेळी तीनही नेत्यांमध्ये जोरदार टोलेबाजी सुरु होती.

तीन नेत्यांमधील टोलेबाजीचं संभाषण वाचा जसंच्या तसं

वैभव नाईक : मी आता कोट घातलाय. तुम्ही कोट घालायचा सोडून दिलाय. तुम्ही मंत्रिपदाची आशा सोडली का? असं लोक म्हणत आहेत.

भरत गोगावले : तू का घातला आहेस मग?

वैभव नाईक : थंडी वाजते म्हणून आणि आमचा कोट तर कायमच राहतो. भरत शेठ दर अधिवेशनाला कोट घालून यायचे. पण ते या अधिवेशनाला कोट घालून आले नाहीत. त्यामुळे त्यांनी मंत्रिपदाची आशा सोडली का?

भरत गोगावले : अधिवेशन संपता संपता सांगतो तुला

वैभव नाईक : हे तुम्ही दर अधिवेशनाला सांगत आहात

भरत गोगावले : हो, अधिवेशन संपायच्या वेळी सांगतो. वैभवची इच्छा असेल तर माझा कोट त्याला शिवून देतो. ऐक रे… मी थांबलोय, वैभव आमच्याकडे येत असेल तर त्यासाठी मी थांबू शकतो

वैभव नाईक : ही ऑफर कोण देतंय? ज्यांना मिळालं नाही ते ऑफर देत आहेत. आमची काय इच्छा आहे, विरोधी पक्षात जरी असलो तरी ज्या पद्धतीने त्यांनी उठाव केला होता, त्या पद्धतीने त्यांना मिळालं नाही. त्याचं दु:ख आम्हालासुद्धा आहे.

संजय शिरसाट : वैभव, त्यांचा व्हीप आम्हाला चालतो. त्यामुळे त्यांनी जर एखादं स्टेटमेंट केलं तर ते अधिकृत असतं. म्हणून जरा बघ बाबा

वैभव नाईक : मंत्रीपद नाही मिळालं तरी चालेल पण तुम्ही कोट घाला. कोट घालून या. भरत शेठ शेठ वाटतात.

भरत गोगावले : असं?

वैभव नाईक : हो

भरत गोगावले : तुझा सल्ला असा चांगला असेल, काही चांगले सल्ले आम्ही मित्रांकडून घेऊ शकतो. तू आमचा पूर्वाश्रमीचा मित्र आहे. तुझे विचार चांगले आहेत. तू कोकणातला आहे. त्यामुळे मला तुझी आशा आहे.

वैभव नाईक : तुम्ही विषय दुसरीकडे करत आहात

संजय शिरसाट : नार्वेकरांकडे चाललेली हिअरिंग आहे. जेव्हा हिअरिंग संपेल तेव्हा काही लोक अपात्र ठरणार आहेत. तेव्हा अपात्र कोण होणार याबाबत आमचे वरिष्ठ नेते विचार करत असतील. त्यामुळे इनकमिंग होणार असेल त्यामुळे कदाचित विस्तार थांबला असेल. वैभव काही जरी झालं तरी आपण एक आहोत ते लक्षात ठेव

पाहा व्हिडीओ :