महाराष्ट्रातील भाजप नेत्यावर खासदारकी रद्द होण्याची टांगती तलवार
उमेदवारी अर्ज दाखल करताना डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्यांनी सादर केलेला बेड जंगम जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड यांनी केली होती.
सोलापूर : महाराष्ट्रातील भाजपचा एक खासदार कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांची खासदारकी धोक्यात आली आहे. जयसिद्धेश्वरशिवाचार्य यांनी सादर केलेलं बेड जंगम जातीचं प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार करण्यात आली होती. महाराष्ट्रातून भाजपचे 23 खासदार निवडून आले (Maharashtra BJP MPs may decrease) आहेत.
डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर या दोघांनाही महास्वामींनी पराभवाची धूळ चारली होती. जवळपास दीड लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवत ते ‘जायंट किलर’ ठरले होते.
खासदार जयसिद्धेश्वर महास्वामींच्या बेड जंगम जात प्रमाणपत्रावरील सुनावणी काल पूर्ण झाली. या सुनावणीत खासदारांच्या वकिलामार्फत सादर करण्यात आलेले 12 अर्ज समितीने फेटाळून लावले आहेत. तर तक्रारदारांनी सादर केलेला साक्षीदार पडताळणीचा अर्जही समितीने फेटाळला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्यांनी सादर केलेला बेड जंगम जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड यांनी केली होती. त्या अर्जावर सुनावणी झाली असून आता अंतिम निर्णय तक्रादारांना पोस्टाने कळवण्यात येणार आहे.
जात पडताळणी समितीने सांगूनही महास्वामींच्या ज्या मूळ कागदपत्रांबाबत तक्रादाराने आक्षेप घेतला होता, ती कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. त्यामुळे महास्वामींची खासदारकी धोक्यात आली आहे.
सोलापूर लोकसभेचे खासदार डॉ. जयसिदेश्वर शिवाचार्य यांनी आपला नामांकन अर्जात दाखल केलेल्या बेड जंगम जातीच्या उल्लेखावर प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे, विनायक कुंदकरे यांनी आक्षेप घेत खासदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार जात पडताळणी समितीसमोर सुनावणीची प्रक्रिया पार पडली.
31 जानेवारी आणि एक फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीत तक्रारदारांनी आक्षेप घेतलेली मूळ कागदपत्रे सादर करण्याचे आदेश समितीने दिले होते. मात्र कालच्या सुनावणीत ती कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. त्यामुळे जयसिदेश्वर शिवाचार्यांची खासदारकी धोक्यात आल्याचं तक्रारदारांना वाटत आहे.
दुसरीकडे, डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींच्या जातीच्या दाखल्यासंर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करत असताना मूळ कागदपत्रे जोडली आहेत. त्यामुळे जात पडताळणी समितीसमोर सादर करता आली नाहीत, असं खासदारांच्या वकिलाने सांगितलं आहे. दक्षता पथकाने नोंदवलेल्या अहवालावर आक्षेप घेत, नवे पथक नियुक्त करुन पुराव्याची पुनर्पडताळणी करण्याची मागणी वकिलाने केली आहे.
दोघांनी आपली बाजू मांडली असली, तरी जात पडताळणी समितीने आपला निकाल राखून ठेवला आहे. निकाल लवकरच तक्रारदारांना पोस्टाने कळवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे समितीच्या निकालावर खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्यांचे भवितव्य (Maharashtra BJP MPs may decrease) अवलंबून आहे.