खातेवाटपाचं सूत्र ठरलं; अजित पवारांकडे अर्थखातं नसणार, तर गृहखात्याबाबतही महत्त्वाचा निर्णय

| Updated on: Dec 13, 2024 | 9:14 AM

Maharashtra Cabinet Expansion : देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या (14 डिसेंबर) होणार आहे. कुणाला कोणतं खातं मिळणार? याबाबतची माहिती सूत्रांनी टीव्ही 9 मराठीला दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिंमंडळात कोण- कोण असणार? वाचा सविस्तर...

खातेवाटपाचं सूत्र ठरलं; अजित पवारांकडे अर्थखातं नसणार, तर गृहखात्याबाबतही महत्त्वाचा निर्णय
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार
Image Credit source: ANI
Follow us on

5 डिसेंबरला फडणवीस सरकारचा शपथविधी पार पडला. नव्या सरकारच्या शपथविधीनंतर आता आठ दिवस उलटले आहेत. मात्र अद्यापपर्यंत उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी आणि खातवाटप जाहीर झालेलं नाही. तर उद्या (14 डिसेंबर) फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या सोमवारपासून (16 डिसेंबर) विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. त्याआधी उद्या हा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, अशी माहिती आहे. यात 35 जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या मंत्रिमंडळात कुणा-कुणाचा समावेश असणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

कुणाकडे किती मंत्रिपदं?

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपकडे 21 खाती, शिवसेना शिंदे गटाकडे 13, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 9 मंत्रिपदं असणार आहेत. यात पहिल्या टप्प्यात 35 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. भाजप 17, तर शिवसेना 10, आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 7 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यात कुणा- कुणाचा समावेश असणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

अर्थखातं आणि गृहखात्याबाबत काय निर्णय?

महत्त्वाचं म्हणजे अर्थखातं आणि गृहखातं भाजप स्वत: कडे ठेवणार आहे. मागच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागल्याने शिवसेनेने वारंवार गृहमंत्रिपद आपल्याकडे असावं, असा दावा केला. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर अजित पवारांना अर्थखातं सांभाळण्याचा दांडगा अनुभव आहे. शिंदे सरकारमध्येदेखील अजित पवार अर्थमंत्री होते. मात्र आता अर्थखातं फडणवीसांकडे राहणार असल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि महसूल खातं असणार आहे. तर अजित पवार यांच्याकडे गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम ही महत्त्वाची खाती असणार आहेत. तर यंदा देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात अनुभवी मंत्र्यांचा समावेश असेल. तर काही नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात येणार आहे. शिवसेनेच्या दीपक केसरकर, अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांचा पत्ता कट होणार असल्याची माहिती आहे.
त्यामुळे आता फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कुणाचा समावेश असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.