Cabinet Expansion मंत्रिमंडळ विस्तार : विखे, क्षीरसागर, अविनाश महातेकर उद्या शपथ घेणार?
16 जून रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, उद्याच सकाळी 11 वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
Cabinet Expansion मुंबई : गेल्या पाच वर्षांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज-उद्या म्हणता म्हणता अखेर जवळपास निश्चित झाला आहे. उद्या म्हणजे 16 जून रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, उद्याच सकाळी 11 वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून 5 ते 6 तर शिवसेनेकडून दोन मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. यामध्ये 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रिपदाचा समावेश असेल.
मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीतून सेनेते आलेले जयदत्त क्षीरसागर यांचा समावेश निश्चित मानला जात आहे. याशिवाय या विस्तारात मित्रपक्षांनाही स्थान देण्यात आलं आहे. रामदास आठवले यांच्या रिपाईलाही मंत्रिपद मिळणार आहे. आठवलेंकडून अविनाश महातेकर यांचे नाव मंत्रिपदासाठी दिलं आहे. रिपाइंचे सरचिटणीस असलेले अविनाश महातेकर हे पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या भेटीला पोहोचले. वांद्रे येथील ‘संविधान’ या आठवलेंच्या निवासस्थानी महातेकर भेटीसाठी दाखल झाले.
शिवसेनेकडून राष्ट्रवादीतून आलेल्या जयदत्त क्षीरसागर यांना कॅबिनेटर तर पंढरपूरचे आमदार तानाजी सावंत यांना राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. तसं ट्विट मुख्यमंत्र्यांनी केलं.
शिवसेनेत धुसफूस?
दरम्यान, शिवसेनेत मंत्रिपदावरुन धुसफूस सुरु आहे. पक्षांतर्गत बंडाळी टाळण्यासाठी स्वत: उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला मिळणारं उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याचं सांगण्यात येत आहे. याशिवाय सेनेत विधानसभा विरुद्ध विधानपरिषद असाही वाद आहे. मंत्रिमंडळामध्ये नेहमीच विधानपरिषदेच्या आमदारांना प्राधान्य मिळत असल्याने विधानसभेतील सेना आमदार नाराज आहेत.
शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यानंतर विधान परिषदेवर निवडून गेलेल्या आमदारांनाच मंत्रिपदासाठी झुकते माप देण्यात आले होते. त्यामुळे लोकांमधून निवडून विधानसभेवर गेलेले पक्षाचे आमदार नाराज होते. आता मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागताच ही नाराजी पुन्हा एकदा उफाळून आली. आताही दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना किंवा विधान परिषदेवरील आमदारांचीच नावे संभाव्य मंत्रिपदासाठी शिवसेनेकडून समोर येऊ लागल्यामुळे विधानसभेतील आमदारांची नाराजी कशी दूर करावी, असा पेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोर होता.
मंत्रिपदासाठी कोणाची नावे चर्चेत?
- जयदत्त क्षीरसागर(शिवसेना)
- तानाजी सावंत (शिवसेना)
- अविनाश महातेकर (आरपीआय)
भाजपकडून कोणाची नावे चर्चेत?
- राधाकृष्ण विखे पाटील
- संजय कुटे
- आशिष शेलार
- अनिल बोंडे
सध्या शिवसेनेकडे पाच कॅबिनेट आणि पाच राज्यमंत्री पदे आहेत
- एकनाथ शिंदे, MSDRC ( सार्वजनिक बांधकाम) मंत्री, तसेच डॉ. दीपक सावंत यांच्या आरोग्य खात्याचा पदभार शिंदे यांच्याकडे आहे.
- सुभाष देसाई, उद्योग मंत्री
- रामदास कदम, पर्यावरण मंत्री
- दिवाकर रावते, परिवहन मंत्री
राज्यमंत्री
- अर्जुन खोतकर
- रवींद्र वायकर
- दादा भुसे
- संजय राठोड
- विजय शिवतारे
संबंधित बातम्या
मंत्रिमंडळ विस्तार : नवी 7 मंत्रिपदे, विखे-क्षीरसागरांना मानाचं पान?
राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीच्या दोन, तर काँग्रेसच्या एका नेत्याला स्थान?
आदित्य ठाकरे शिवसेनेकडून उपमुख्यमंत्रीपदाचा चेहरा?
नाराजी उफाळण्याच्या भीतीने मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर?