मंत्रिमंडळ विस्तार उद्या होण्याची शक्यता कमी, शिवसेना 13, राष्ट्रवादीचे 13 मंत्री शपथ घेणार!
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार (Maharashtra cabinet Expansion) उद्या अर्थात 24 डिसेंबरला होण्याची शक्यता आता मावळल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार (Maharashtra cabinet Expansion) उद्या अर्थात 24 डिसेंबरला होण्याची शक्यता आता मावळल्याचं सांगण्यात येत आहे. कारण सरकारकडून अद्याप राज्यपालांची वेळच घेण्यात आलेली नाही. शिवाय 25 आणि 26 तारखेलाही हा विस्तार होण्याची चिन्हं कमीच आहेत. अमावस्या आणि चंद्रग्रहणाच्या फेऱ्यात मंत्रिमंडळ विस्तारात अडकल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.
सध्या उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात एकूण 7 मंत्री आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना त्यांच्यासोबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी 2 अशा 6 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. 28 नोव्हेंबरला शपथविधी झाल्यानंतर, 12 डिसेंबरला खातेवाटप झालं होतं. (Maharashtra cabinet Expansion)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेकडून सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ, तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत अशा सात मंत्र्यांनी 28 नोव्हेंबर रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर दोन आठवड्यांनी, म्हणजेच 12 डिसेंबरला तात्पुरते खातेवाटप करण्यात आले. आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त (Congress Possible Ministers List) कधी लागणार, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
येत्या 27 किंवा 28 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे 13, राष्ट्रवादीचे 13 आणि काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
मंत्रिपदाची शपथ कोण घेणार?
मंत्रिपदाची शपथ कोण घेणार? त्या आमदारांची यादी शिवसेनेनंही तयार केली आहे.आणि राष्ट्रवादीचीही यादी तयार आहे. मात्र काँग्रेसचं ठरवण्यासाठी अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार आणि नितीन राऊत दिल्लीत हायकमांडच्या भेटीसाठी आले. खरं तर काँग्रेसची यादी 2 चव्हाणांच्या मंत्रिपदाच्या आग्रहामुळं रखडली होती. मात्र माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाणांपैकी अशोक चव्हाणांना मंत्रिपद देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. तर पृथ्वीराज चव्हाणांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळू शकते. काँग्रेसच्या वाट्याला महसूल, ऊर्जा आणि सार्वजनिक बांधकाम ही 3 महत्वाची खाती आहेत. त्यापैकी बाळासाहेब थोरातांकडे महसूल खातं देण्यात आलं. त्यामुळं दुय्यम खात्यांसाठी माजी मुख्यमंत्र्यांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची हायकमांडकडे मागणी करण्यात आली. त्यानुसार काँग्रेसची यादीही दिल्लीत फायनल झाल्याचं कळतंय.
नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान, शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली होती. दोन्ही पक्षांची विस्ताराची यादी तयार आहे. मात्र काँग्रेसकडून कोणाला मंत्रिपदं द्यायची यावरुन खल सुरु आहे. काँग्रेसचे नेते आज दिल्लीला गेले आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्रातील दिग्गज नेते दिल्लीत दाखल झाले असून ते आज पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वरिष्ठ नेत्यांची दिल्ली दरबारी चर्चा होण्याची चिन्हं आहेत.
मंत्रिपदासाठी काँग्रेस नेत्यांची दिल्लीवारी, ‘ही’ सात नावं चर्चेत
महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण दिल्लीत दाखल झाले आहेत. काँग्रेसकडून थोरातांसह नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. आता दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांना वगळून नवोदितांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
मंत्रिपदासाठी विजय वडेट्टीवार, के. सी. पाडवी, सुनील केदार, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, अमित देशमुख, वर्षा गायकवाड या आमदारांची नावं चर्चेत आहेत.
शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नेमकी किती मंत्रिपदं, याचा फॉर्म्युला अधिकृतरित्या कोणत्याही पक्षाने सांगितलेला नाही. मात्र खातेवाटपामध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला 13 आणि काँग्रेसकडे 12 खाती आहेत.
सध्या महसूल मंत्रालयाची धुरा बाळासाहेब थोरातांकडे असून त्यांच्याकडे हे मंत्रिपद कायम राहण्याचे संकेत आहेत. महिला आणि बाल विकास मंत्रिपदी यशोमती ठाकूर किंवा वर्षा गायकवाड यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम, शालेय शिक्षण यासारखी महत्त्वाची मंत्रालयं कोणाकडे जाणार, याची उत्सुकता आहे.
शिवसेनेकडील महत्त्वाची खाती – मुख्यमंत्री, गृह, नगरविकास, उद्योग, कृषी, क्रीडा आणि परिवहन, सार्वजनिक बांधकाम
राष्ट्रवादीकडील महत्त्वाची खाती – अर्थ, गृहनिर्माण,राज्य उत्पादन शुल्क, आरोग्य, ग्रामविकास, सहकार आणि जलसंपदा
काँग्रेसकडील महत्त्वाची खाती – महसूल, ऊर्जा, शालेय शिक्षण, महिला बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम, वैद्यकीय शिक्षण
संबंधित बातम्या
मंत्रिपदासाठी काँग्रेस नेत्यांची दिल्लीवारी, ‘ही’ सात नावं चर्चेत
ठाकरे सरकारचं खातेवाटप जाहीर, शिवसेनेकडे तगडी खाती, एकट्या एकनाथ शिंदेंकडे 10 मंत्रालये
ठाकरे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त जवळपास निश्चित