“ठाकरे कुटुंबियांबाबत आक्रमक भूमिका घेऊ नका, थोडं सबुरीनं घ्या”, मुख्यमंत्र्यांच्या आमदारांना स्ट्रिक्ट सूचना, सूत्रांची माहिती
शिंदेगट मवाळ होणार?
मुंबई : शिवसेनेतील दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदारांनी बंडखोरी करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. पण या सगळ्या घडामोडीत शिंदे गटातील आमदारांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यावर सडकू टीका केली. वेळप्रसंगी गंभीर आरोप केले. त्यावर मी कुठे कमी पडलो, अजून काय देणं बाकी होतं, असं उद्धव ठाकरे वारंवार म्हणताना दिसले. शिवसेनेची ओळख असणाऱ्या धनुष्यबाण चिन्हावरही शिंदेगटाने दावा केला. पण आता त्यांची भूमिका मवाळ व्हायला लागली आहे, असं म्हणता येईल. कारण “ठाकरे कुटुंबियांबाबत आक्रमक भूमिका घेऊ नका, थोडं सबुरीनं घ्या”, अश्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आपल्या गटातील आमदारांना दिल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आमदारांना सूचना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील आमदारांना दिल्या आहेत. जरा मवाळ भूमिका घेण्याच्या सूचना शिंदेनी दिल्या आहेत “ठाकरे कुटुंबियांबाबत आक्रमक भूमिका घेऊ नका, थोडं सबुरीनं घ्या”, अश्या सूचना मुख्यमंत्र्यांनी आपल्या गटातील आमदारांना दिल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विनाकारण ठाकरेंवर टीका करू नका, असंही ते म्हणालेत. अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी tv9मराठीला दिली आहे.
सामनातून शुभचिंतन
सामनाच्या आजच्या अग्रलेखात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी शुभचिंतन व्यक्त करण्यात आलंय. सध्या एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती ठीक व्हावी आणि त्यांना बळ मिळो! अश्या शीर्षकाखाली आजचा आजचा अग्रलेख प्रसिद्ध झालाय. “शिंद्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या चाळीस समर्थकांसाठी हा शुभशकुन नाही. औटघटकेच्या सरकारसाठी ‘स्ट्रेचर’ व अॅम्ब्युलन्स तयार ठेवायला हवी. शिंद्यांनी लवकर बरे व्हावे, त्यांना बरेच काही पाहायचे आहे. ईश्वर त्यांना ते सर्व पाहण्याचे बळ देवो!”, असं सामनात म्हणण्यात आलंय. शिवाय सर्वोच्च न्यायालयीन सुनावणीचा दाखला देत ‘धनुष्य बाण’ आमच्याकडेच राहणार, असा विश्वासही व्यक्त करण्यात आलाय.
लवकरच मंत्रिमंडळ विस्तार
नवे सरकार अस्तित्वात येऊन अनेक दिवस झाले आहेत. मात्र तरी अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? मंत्रिमंडळात भाजप आणि शिंदे गटातील कोणत्या नेत्यांना संधी मिळणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने विरोधकांकडून देखील नव्या सरकारवर जोरदार टीका होत आहे. अखेर आता लवकरच मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळण्याची दाट शक्यता आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे देखील दिल्लीला जाणार आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो असा अंदाज बांधण्यात येत आहे.