नाना पटोलेंची धूसफूस, थोरात अस्वस्थ, काँग्रेसमध्ये आलबेल का नाही? पृथ्वीराज चव्हाण यांनी कारण सांगितलं…
साताऱ्यात माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली. सातारा जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने कराडमध्ये हाथ से हाथ जोडो अभियानाला सुरुवात झाली.
दिनकर थोरात, साताराः नाशिक (Nashik) विधान परिषद (MLC Election) पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीवरून काँग्रेसमधील (Congress) अतंर्गत राजकारण चव्हाट्यावर आलं आहे. आता तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात थेट पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्यात आली आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी हे पत्र पाठवल्याची माहिती समोर आली आहे. तर थोरात यांच्याविरोधात माझ्याकडेही भरपूर मसाला असल्याचा उघड इशारा काल नाना पटोले यांनी दिलाय. काँग्रेसवर तीव्र नाराज असलेल्या सत्यजित तांबे यांनी शनिवारी उघडपणे भूमिका मांडली. नाना पटोले यांच्या भूमिकेवरून प्रश्नचिन्ह उभे केले. नाशिक विधान परिषद निवडणूकीच्या उमेदवारी अर्ज भरण्यापासून निकाल जाहीर होईपर्यंत मौन धारण केलेल्या बाळासाहेब थोरात यांनी मात्र आता स्पष्ट भूमिका घेतली आहे. काँग्रेसमधली ही अस्वस्थता नेमकी का आहे, असे प्रश्न विचारले जात आहेत. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याचं उत्तर दिलंय.
काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
काँग्रेसमधील नाराजीसंदर्भात काँग्रेस समिती निर्णय घेईल. मात्र भरपूर लोकशाही आहे, हीच काँग्रेसची नेमकी अडचण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस सदस्यांनी पक्षाची शिस्त पाळली पाहिजे. सत्यजित तांबे यांच्या आरोपाबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी होईल, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय.
साताऱ्यात माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली. सातारा जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने कराडमध्ये हाथ से हाथ जोडो अभियानाला सुरुवात झाली. या कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह, माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील, अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हे उपस्थित होते.
सत्यजित तांबेंचे गंभीर आरोप
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्याचे जाहीर केलं होतं. मात्र त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी निवडणूक लढवायची असा निर्णय तांबे-थोरात कुटुंबियांनी घेतला. हा निर्णय नाना पटोलेंपर्यंत पोहोचवला असतानाही प्रदेशाध्यक्ष कार्यालयातून चुकीचे एबी फॉर्म आल्याचा गंभीर आरोप सत्यजित तांबे यांनी केला. याविषयी माहिती दिल्यानंतरही दुसऱ्यांदा पुन्हा एकदा डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाचा एबी फॉर्म पाठवण्यात आला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी असे प्रकार का केले, यावरून सत्यजित तांबे यांनी सवाल उपस्थित केलाय.
थोरात अस्वस्थ, पक्षश्रेष्ठींना पत्र
नाशिक-नगर जिल्ह्यावर प्रभुत्व असलेले काँग्रेसचे महत्त्वाचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही आता उघडपणे भूमिका घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणं अशक्य असल्याचं पत्र त्यांनी हायकमांडला पाठवल्याचं कळतंय. असंच सुरू राहिलं तर काँग्रेसमध्ये दोन गट पडतील, असा इशाराती बाळासाहेब थोरात यांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
पक्षांतर्गत राजकारणावर बाहेर बोलू नये,या मताचा मी आहे. मात्र विधान परिषद निवडणुकीत खूप राजकारण झालं. त्यामुळे मी व्यथित असल्याचं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलंय.