नवी दिल्ली: महाराष्ट्रात काँग्रेसने नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड करायची ठरवल्यास तो लढाऊ बाण्याचा असावा, अशी मागणी विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी केली. विदर्भात काँग्रेस पक्ष मजबूत आहे. त्यामुळे विदर्भाचा अध्यक्ष झाल्यास आनंद वाटेल, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. (vijay wadettiwar on Maharashtra congress president selection)
विजय वडेट्टीवार हे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या नेत्यांपैकी एक आहेत. त्यासाठी विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी दिल्लीत काँग्रेस सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांची भेट घेतली. या बैठकीनंतर वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्यातील नवा प्रदेशाध्यक्ष फायटर असावा. तसेच आपण के.सी. वेणुगोपाल यांच्याशी पक्ष संघटना व ओबीसी समाजाच्या मागण्यांबाबत चर्चा केल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा काही केल्या सुटताना दिसत नाही. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळवण्यास उत्सुक असल्याची माहिती आहे. वडेट्टीवार यांची काँग्रेस सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांच्यासोबत दिल्लीत बैठक झाली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदाबाबत विजय वडेट्टीवार आणि के सी वेणूगोपाल यांची राजधानीत खलबतं झाली. विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपल्या खांद्यावरील जबाबदारीची झूल उतरवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानंतर नव्या प्रदेशाध्यक्षपदाचा शोध सुरु आहे.
दुसरीकडे, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष बदलण्यास राष्ट्रवादीला कुठलीही हरकत नसल्याचं समजतं. राज्यात सरकारला पूर्ण बहुमत आहे. काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष बदलण्याचं ठरवल्यास महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादीला कोणतीही अडचण नाही. त्यामुळे विद्यमान विधानसभा अध्यक्ष नाना पटोले थोरातांच्या ऐवजी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसण्याची शक्यताही बळावली आहे.
मुंबईचा फॉर्म्युला वापरणार?
काँग्रेसमधील अनेक बडे नेते प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. मात्र, प्रदेशाध्यक्षपदाची संधी एकाच नेत्याला मिळाल्यानंतर इतर नेते नाराज होण्याची शक्यता आहे. यासाठी काँग्रेसकडून आता ‘मुंबई मॉडेल’चा वापर करून या नेत्यांची समजूत काढली जाऊ शकते. या फॉर्म्युलानुसार प्रदेशाध्यक्ष न होऊ शकलेल्या नेत्यांकडे इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. तसेच प्रदेशाध्यक्षासह चार कार्यकारी अध्यक्ष नेमण्याची परंपरा कायम ठेवण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या:
प्रदेशाध्यक्षपद न मिळाल्यास नाराज नेत्यांची समजूत काढण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्युला
सातव, केदार, वडेट्टीवार, ठाकूर, पटोले की चव्हाण?; काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच
(vijay wadettiwar on Maharashtra congress president selection)