बंगल्यावरुन रुसवे-फुगवे, पाडवींना दिलेला बंगला नीलम गोऱ्हेंना परत
मंत्र्यांना वाटप करण्यात आलेल्या बंगल्यांवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये रुसवे-फुगवे सुरु आहेत.
मुंबई : ठाकरे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्याचं आता लक्ष खातेवाटपाकडे लागलं आहे (Maharashtra Cabinet Expansion). खातेवाटप आज होईल, उद्या होईल, असं सांगण्यात येत असलं, तरी महाविकास आघाडीत अद्याप खातेवाटपावर संभ्रम कायम असल्यची माहिती आहे. त्यापूर्वी मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचं वाटप (Ministers Bungalow Issue) करण्यात आलं. मात्र, मंत्र्यांना वाटप करण्यात आलेल्या बंगल्यांवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये रुसवे-फुगवे सुरु आहेत. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा मंत्रालयाजवळील क-3 हा बंगला काँग्रेसचे मंत्री के.सी.पाडवी यांना देण्यात आला होता. यावर गोऱ्हे संतप्त झाल्यानंतर आता त्यांना तो बंगला परत दिला जाणार आहे. पाडवी यांना अ-5 बंगला देण्यात आला आहे (Ministers Unhappy With Allotted Bungalows).
विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार यांना ब-1 हा बंगला पूर्वीच देण्यात आला आहे. मात्र, गुरुवारी (2 जानेवारी) झालेल्या वाटपात त्यांना अ-3 हा बंगला देण्यात आल्याने वडेट्टीवार नाराज झाले. त्यामुळे त्यांना पुन्हा ब-1 हा बंगला देण्यात आला. ब-1 बंगला राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांना देण्यात आला होता. आता त्यांना अ-3 बंगला देण्यात आला आहे.
आधीच्या भाजप सरकरामधील क्रमांक दोनचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचा अ-9 बंगला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर तो बंगला राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांना देण्यात आला. या निर्णयानंतर प्रवीण दरेकर नाराज झाले. सरकारी बंगल्यातून त्यांची रवानगी थेट अवंती-अंबरमधील फ्लॅटमध्ये करण्यात आली. आता ते तो फ्लॅट बदलून देण्याची मागणी करत आहेत.
शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना क-8 हा बंगला देण्यात आला होता. मात्र, तो बदलून आता त्यांना क-1 हा बंगला देण्यात आला. त्यामुळे ते देखील नाराज झाले होते. त्यामुळे शुक्रवारी (3 जानेवारी) रात्री उशिरा त्यांना पुन्हा क-8 हा बंगला देण्यात आला आहे.
Ministers Unhappy With Allotted Bungalows