अहमदनगर : संपूर्ण देशात आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिवरेबाजार ग्रामपंचायतीवर पोपटराव पवार यांचं वर्चस्व कायम राहिलं आहे. पोपटराव पवार यांच्या आदर्श ग्राम विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. पोपटराव पवार यांच्या पॅनलनं विरोधकांचा जोरदार पराभव केलाय. हिवरेबाजारमध्ये पोपटराव पवार यांच्या पॅनलला 7 तर विरोधकांना 0 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे हिवरेबाजार ग्रामपंचायतींवर पुन्हा एकदा पोपटराव पवार यांचं वर्चस्व कायम असल्याचं पाहायला मिळत आहेत.(Popatrao Pawar’s victory in Hivrebazar Gram Panchayat election)
हिवरेबाजारमध्ये 1989 पासून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत आली आहे. यंदा मात्र हिवरेबाजारमध्ये बिनविरोध निवडणूक होऊ शकली नव्हती. त्यामुळे गेल्या 30 वर्षांची परंपरा यंदा खंडीत झाली होती. पण पोपटराव पवार यांच्या आदर्श ग्रामविकास पॅनलला विजय मिळाल्यानं हिवरे बाजारमधील ग्रामस्थांनी पोपटराव यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास दाखवल्याचंच पाहायला मिळत आहे.
“ज्या हाताने गाव उभं केलं. त्याच गावाने मताच्या माध्यमातून त्यांची प्रतिक्रिया दिली आहे हे महत्त्वाचं. गाव सांभाळणारे हात आणि गाव मजबूत करणारे हात गावकऱ्यांनी मजबूत केले, हेच या निकालातून स्पष्ट होतंय,” अशी प्रतिक्रिया पोपटराव पवार यांनी विजयानंतर व्यक्त केली आहे.
हिवरेबाजारमध्ये पोपटराव पवार यांचा शब्द अंतिम मानला जात होता. त्यामुळे 7 सदस्यीय ग्रामपंचायत 1989 पासून बिनविरोध राहिली. पण यंदा ही परंपरा खंडीत झाली असून सातही जागांसाठी निवडणूक पार पडली. पण पोपटराव पवार यांनी केलेला हिवरेबाजारचा विकास आणि देशभरात पोहोचवलेलं गावाचं नाव यामुळे ग्रामस्थांनी पोपटराव यांच्या हाती पुन्हा एकदा सत्ता दिली आहे.
तब्बल 30 वर्षानंतर निवडणूक पार पडल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. सत्ताधाऱ्यांकडून दहशत निर्माण केली जात असल्याने प्रचारा दरम्यान पोलीस संरक्षण देण्याची मागणी विरोधकांनी केली होती. विरोधकांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन ही मागणी केली होती.
संबंधित बातम्या :
Popatrao Pawar’s victory in Hivrebazar Gram Panchayat election