सीमाप्रश्नी दिल्लीत काय घडामोडी? अमित शहांनी भेट टाळली? महाविकास आघाडीचं पत्र काय?
शांततेत निदर्शनं करणाऱ्या मराठी जनतेवर सीमा भागात अत्याचार करण्यात येतोय, असा दावा महाविकास आघाडीने या पत्रातून केला आहे.
मुंबईः महाराष्ट्र-कर्नाटक (Maharashtra Karnataka) सीमाप्रश्वावर शिंदे-भाजप सरकार गांभीर्याने ठोस पावले उचलत नसल्याची टीका करत महाविकास आघाडीने रान पेटवलं आहे. यावरून आम्हीच केंद्र सरकारकडे निवदेन सादर करू अशी भूमिका मविआने घेतली. त्यानुसार आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेण्याचे ठरवण्यात आले होते.
मात्र ऐनवेळी नवी दिल्लीत आज अमित शाह यांनी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांशी भेट घेणं टाळलं. त्यांना आमच्यापेक्षा जास्त ठाकरे गटाच्या नेत्यांना भेटण्याची इच्छा असेल किंवा गुजरात विधानसभा निवडणुकांमुळे भेटण्यास वेळ मिळाला नसेल, असा टोमणा मारला. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी हा टोला लगावला.
महाविकास आघाडीने आपली भूमिका एका निवेदनामार्फत केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई उघड धमकी देतात. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादानं जर हिंसक वळण घेतलं तर ? कर्नाटकात महाराष्ट्र पासिंगच्या गाड्या अडवल्या जातायेत.. याला इथं प्रतिक्रिया इथं मिळाली तर ? यासाठी केंद्र सरकार जबाबदार असेल, असे पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे.
केंद्रीय गृहमंत्री म्हणून यामध्ये लक्ष घालावं. गृहमंत्री यांनी आम्हाला वेळ दिली होती मात्र ते भेटले नाहीत. कदाचित मिंधे गटाला आधी भेटायचं असावं किंवा गुजरात निकाल असावा.. अशी टिप्पणी अरविंद सावंत यांनी केली. मात्र आम्हाला जे बोलायचं होतं, ते निवेदनामार्फत सांगितल्याचं सावंत म्हणाले.
सीमा प्रश्न बाबत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सीमा भागातील 865 गावांमध्ये मराठी लोकांचं वास्तव्य आहे. या मराठी लोकांच संरक्षण करण्याची गरज आहे.
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी या भागात कायदा सुव्यवस्था राखणे गरजेचं आहे. शांततेत निदर्शनं करणाऱ्या मराठी जनतेवर सीमा भागात अत्याचार करण्यात येतोय, असा दावा महाविकास आघाडीने या पत्रातून केला आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सीमाप्रश्नी मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारतर्फे यात काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचं लक्ष लागंलय.
दरम्यान, सीमाप्रश्नी परखड बोलल्यामुळे आणि मंत्री शंभूराज देसाईंनी इशारा दिल्यानंतर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून धमकीचे फोन आल्याची माहिती संजय राऊत यांनी आज पत्रकारांना दिली. माझ्यावर हल्ला झाला तर तो संपूर्ण महाराष्ट्रावरील हल्ला असेल, असा इशाराही राऊत यांनी दिलाय.