मुंबईः विधानसभेत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी तुफ्फान टोलेबाजी केली. महाराष्ट्र राज्याला पहिल्यांदाच दाढीवाला मुख्यमंत्री मिळालाय. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची दाढी काळी आहे तर माझी दाढी पांढरी आहे, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं. यानंतर विधानसभेत एकच हशा पिकला. जीएसटीच्या मुद्द्यावरून छगन भुजबळांनी केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात मुद्दे उपस्थित केले. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनीही केंद्र सरकारला विनंती करून अत्यंत निकडीच्या वस्तुंवर लावलेला जीएसटी कमी करावा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Monsoon Session) काल 17 ऑगस्टपासून सुरु झाले आहे. येत्या 25 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन सुरु राहिल. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी छगन भुजबळांची टोलेबाजी चांगलीच गाजली.
विधानसभेत आज बोलताना छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाढीवरून टोलेबाजी केली. ते म्हणाले, मला तर आपल्याकडे पाहून खूप आनंद वेगळाच आहे. तुम्ही मुख्यमंत्री झालात. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिले मुख्यमंत्री दाढीवाले झालेत. त्याच्यातही सफेद दाढी आणि काळी दाढी हा फरक आहे. काळ्या दाढीचा प्रभाव इकडेच आहे.. पांढऱ्या दाढीचा प्रभाव हिंदुस्थानभर आहे. दिल्लीपासून… असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं…
छगन भुजबळ एकनाथ शिंदे यांच्या दाढीवरून विधानसभेत बोलत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मध्येच एक टोला हाणला. महाराष्ट्रात दाढीवाले मुख्यमंत्री झाल्याचा मला आनंद आहे… इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं… असं भुजबळ म्हणताच देवेंद्र फडणवीस म्हणाले… तुम्हालाही स्कोप आहे.
केंद्र सरकारने अनेक दैनंदिन वस्तुंवर जीएसटी लावलाय. त्यामुळे महागाई प्रचंड वाढल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला. यावेळीही त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना उद्देशून वक्तव्य केलं. शाळेची पेन्सिल रबरही महागलं.. तुम्ही दोघे अतिशय कार्यक्षम आहात. दोघांचा दरारा खूप आहे.उपमुख्यमंत्र्यांचा दरारा खूप वाढलाय. त्यांनी हे सांगितलं पाहिजे, जीएसटी लावता, याचा फार वाईट परिणाम सर्वसामान्यांवर होतो. स्कूल चले हम जीएसटी के साथ… अशा घोषणाही लोकं द्यायला लागलेत.
छगन भुजबळ यांच्या फटकेबाजीनंतर देवेंद्र फडणवीसांनीही दाढीवरून भुजबळांना सुनावलं. ते म्हणाले, तुम्ही ज्येष्ठ आहात. प्रत्येक गोष्टीची माफी आहे. पांढऱ्या दाढीचा आमच्याकडे फार सन्मान आहे…