शिवसेना-भाजपात दुरावा वाढवण्याची पवारांची खेळी यशस्वी?
मुंबई : भाजप आणि शिवसेनेची अवस्था सध्या ‘तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना’, अशी आहे. अनेक मुद्यावरून शिवसेना भाजपावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. युती तोडण्याची धमकीही देते. तरीही भाजपा नमतं घेत शिवसेनेला वारंवार चुचकारते. त्यातच आता शिवसेनेला खुश करण्याची एक संधी भाजपच्या हातातून गेली आहे. विधानसभेचं उपाध्यक्ष पद शिवसेनेकडे देऊन भाजपाने नाराज […]
मुंबई : भाजप आणि शिवसेनेची अवस्था सध्या ‘तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना’, अशी आहे. अनेक मुद्यावरून शिवसेना भाजपावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. युती तोडण्याची धमकीही देते. तरीही भाजपा नमतं घेत शिवसेनेला वारंवार चुचकारते. त्यातच आता शिवसेनेला खुश करण्याची एक संधी भाजपच्या हातातून गेली आहे.
विधानसभेचं उपाध्यक्ष पद शिवसेनेकडे देऊन भाजपाने नाराज शिवसेनेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. विधान परिषदेचं उपसभापती पदही शिवसेनेला देऊन शिवसेनेला खुष करण्याचा भाजपाचा दुसरा प्रयत्न होता. परंतु, मुरब्बी राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खेळी करत भाजपचा हा प्रयत्न हाणून पाडला. विधानपरिषदेचं उपसभापती पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणण्याचा पवारांचा प्रयत्न आहे. कारण याच शरद पवारांच्या आदेशावरून 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांचं सरकार वाचलं होतं.
गेले चार वर्ष रिक्त असलेलं विधानसभेचं उपाध्यक्ष पद आता शिवसेनेकडं आलंय. विधानसभेच्या उपाध्यक्षपदी शिवसेना आमदार विजय औटींची बिनविरोध निवड झाली. विधानसभा निवडणुकीसाठी अवघा एक वर्षांचा काळ शिल्लक असताना भाजपने उपाध्यक्षपद शिवसेनेकडे देऊन शिवसेनेच्या वाघाला चुचकारण्याचा प्रयत्न केलाय. विधानपरिषदेची उपसभापतीची निवड शरद पवारांच्या खेळीमुळे होऊ शकली नाही.
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा शुक्रवार शेवटचा दिवस होता. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपसभापती निवडणुकीबाबत शरद पवारांना फोन केला होता. पण मुख्यमंत्र्यांच्या फोननंतरही सभापती रामराजे निंबाळकर यांनी निवडणूक लावली नाही. रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादीचे सदस्य आहेत. निवडणूक न लावताच त्यांनी सभागृह तहकूब केलं. पवारांनी शिवसेना आणि भाजपात दुरावा आणण्याची खेळी साधल्याचं बोललं जात आहे.