मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भुजबळांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर जाऊन ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा केली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळही उपस्थित होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ओबीसींचं नेतृत्त्व करावं, अशी खुली ऑफर देत फडणवीसांनी केंद्र सरकारकडे जाऊन इम्पेरिकल डाटा मागावा” असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले होते. त्यानंतर आज भुजबळ थेट देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले.
सुप्रीम कोर्टाने ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त राजकीय आरक्षण रद्द केलं आहे. त्यामुळे हे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी, इम्पेरिकल डाटा मिळवणे आवश्यक आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी भुजबळांनी काही दिवसापूर्वी मागणी केली होती.
छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ सागर निवासस्थानी भेटले. भुजबळांचं निवासस्थान रामटेक ते सागर बंगला हे काही पावलांचं अंतर आहे. त्यामुळे आज सकाळीच छगन आणि समीर भुजबळ दोघेही देवेंद्र फडणवीसांना भेटले. या नेत्यांमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत चर्चा झाली.
इम्पेरिकल डाटा केंद्राने द्यावा अशी मागणी राज्य सरकारची आहे. त्यासंदर्भात भुजबळ फडणवीसांना भेटले, तसंच सरकारला मदत करावी, अशी चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.
विधानसभेचं पावसाळी अधिवेशन पाच आणि सहा तारखेला दोन दिवसांचं झालं. त्यावेळीही याच विषयावर चर्चा झाली होती. त्यावेळी भुजबळांनी प्रस्ताव मांडला होता, त्यावेळी विरोधी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली होती.
ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण लागू करणारं महाराष्ट्र हे पहिल राज्य आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण संकटात आलं, त्यामुळे ओबीसींच्या विविध 56 हजार जागा संकटात आल्या आहेत. मी कुणावर आरोप करत नाही, ना पंकजा मुंडे ना देवेंद्र फडणवीस पण ते कशाप्रकारे दिशाभूल करत आहेत ते सांगावं लागेल. देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींचं नेतृत्त्व करावं आणि पंतप्रधानांकडे चलावं इम्पेरीकल डेटा मागावा, असं छगन भुजबळ म्हणाले होते.