मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे लढवय्ये नेते आहेत. त्यांचं राजकीय भविष्य उज्ज्वल आहे. त्यांना संन्यासाची भाषा शोभत नाही. ते फकीर होण्याची भाषा करत असतील तर मी स्वत: त्यांची भेट घेईन, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. तीन ते चार महिन्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत करुन दिलं नाही तर राजकारणातून संन्यास घेईन असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं. (Maharashtra needs Devendra Fadnavis, his future is bright, I will meet him personally, said Sanjay Raut)
संजय राऊत म्हणाले, “देवेंद्रजींना संन्यास घेऊ देणार नाही, त्यांची महाराष्ट्र, देशाला गरज आहे. त्यांची वीरक्तीची भाषा हा महाराष्ट्रावर अन्याय होईल. चांगल्या नेतृत्त्वाचा राजकारणात तुटवडा आहे. देवेंद्र फडणवीसांसारख्या हरहुन्नरी नेत्यांना फकीर होण्याची भाषा योग्य नाही. फडणवीस लढवय्ये नेते आहेत”
देवेंद्र फडणवीस लढवय्ये आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सहकार्य करावं, संन्यास वगैरे घेण्याची भाषा करु नका, त्यासाठी मी त्यांना स्वत: भेटून त्यांना सांगेन तुमचं राजकीय भाषा उज्ज्वल आहे, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
महाराष्ट्रात तीन पक्षांची महाविकास आघाडी आहे. तिन्ही पक्ष स्वतंत्र आहेत, त्यांच्या राजकीय विचारधारा वेगळ्या असल्या तरी किमान समान कार्यक्रमानुसार सरकार सुरु आहे. भांड्याला भांडं लागणारच, ते लागायलाही हवंच, तरच संसार टिकतो. भाजप-शिवसेना युती सरकारमध्येही भांड्याला भांडी लागत होती असं नाही तर भांडी फुटत होती, तरीही सरकार पाच वर्ष टिकलं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारही पाच वर्ष पूर्ण करेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
भाजपने 26 जून रोजी ओबीसी आरक्षण पूर्ववत करावं यासाठी चक्का जाम आंदोलन केलं होतं. नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडलं. यावेळी फडणवीसांनी सरकारवर तुफान हल्ला चढवला. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलंय, पण आमच्या हातात पुन्हा सूत्रं दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
संबंधित बातम्या