पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच, अमित शाहांच्या दाव्याने शिवसेनेची नाराजी?
मुख्यमंत्रीपदाच्या भाजपच्या दाव्यावरही शिवसेनेत आश्चर्य व्यक्त होत आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी पुढचा मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल, असं बैठकीत सांगितल्याने शिवसेनेतून आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या अगोदर शिवसेना आणि भाजप यांच्या युतीत धुसफूस सुरु झाली आहे. जागा वाटपाच्या भाजपने जाहीर केलेल्या फॉर्म्युल्यावर शिवसेनेचे नेते खाजगीत नाराजी व्यक्त करीत असताना, मुख्यमंत्रीपदाच्या भाजपच्या दाव्यावरही शिवसेनेत आश्चर्य व्यक्त होत आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी पुढचा मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल, असं बैठकीत सांगितल्याने शिवसेनेतून आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असे विधान केल्याची सूत्रांची माहिती आहे. पण शिवसेनेतील सूत्रांचं म्हणणं आहे की, अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला होता. शिवाय सत्तेतही समसमान वाटा ठरल्याचा सूत्रांचा दावा आहे.
जबाबदारी आणि अधिकारांचे समसमान वाटप अशी भूमिका युती जाहीर करीत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे मांडली होती. जागा वाटपाचा फॉर्म्युला, मुख्यमंत्रीपदाचा दावा अशा बातम्या सूत्रांकरवी प्रसारमाध्यमांना देऊन शिवसेनेवर विधानसभा निवडणुकीत दबाव वाढवण्याची भाजप धुरिणींची खेळी आहे का, असाही प्रश्न उपस्थित होतो. कारण, लोकसभा निवडणुकीतील यशामुळे विधानसभा निवडणूक युतीत लढवण्यासाठी दोन्ही पक्षांचे नेतृत्व आग्रही आहे.
अमित शाह काय म्हणाले?
महाराष्ट्र भाजप कोअर कमिटीची दिल्लीत अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यामध्ये आगामी रणनीती आखण्यावर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रात येत्या तीन महिन्यात विधानसभेची निवडणूक होईल. त्यामुळे मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल, असं अमित शाह बैठकीत म्हणाल्याची माहिती आहे. भाजपच्या या भूमिकेनंतर शिवसेनेत आश्चर्य व्यक्त केलं जातंय. युतीने महाराष्ट्रात 48 पैकी 41 जागा मिळवत लोकसभेला घवघवीत यश मिळवलं होतं.