गुवाहाटी : गुवाहाटीतमध्ये (Guwahati) ठेवण्यात आलेल्या बंडखोर आमदारांमध्ये आता खटके उडण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्यामध्ये जोरदार वादावादी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याबाबत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून दावा करण्यात आला आहे. बंडखोरांविरोधात राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये असंतोष आहे. शिवसैनिक पेटून उठल्याने आसाममधल्या रॅडिसन ब्ल्यू (Radisson Blu) हॉटेलमधील आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. त्यातून त्यांचा गुवाहाटीमधील मुक्काम वाढला आहे. मात्र आता या आमदारांचा संयम सुटला असून, त्यांच्यामध्ये भांडणे सुरू झाल्याचाही दावा सामनामधून (Samana) करण्यात आला आहे. या बंडखोर आमदारांची कुंटुंबीय देखील धास्तावली आहेत. तुम्ही गद्दारी केली, पैशांसाठी बंडंखोरी केली. तुम्ही गुवाहाटीला पोहोचल्याने या सर्वांमधून सुटलात. मात्र आम्ही इथे कोणत्या परिस्थितीमध्ये जगत आहोत, आमचे घराबाहेर निघणे देखील अशक्य झाले आहे, असे या आमदारांना यांच्या जवळचे लोक सांगत आहेत. त्यामुळे ते अस्वस्थ झाले असून, एकनाथ शिंदे यांनी त्यांना संयम ठेवण्याचे आवाहन केल्याचे देखील सामनाने म्हटले आहे.
दरम्यान यावेळी समानामधून भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधण्यात आला आहे. भाजपाच्या जाळ्यात आडकून बंडखोर आमदार आणि त्यांच्या म्होरक्याने महाराष्ट्रातून पळ काढला. आधी सुरतला गेले त्यानंतर तेथून ते आसामला गेले. आमदारांना सोबत नेताना महाशक्तीसोबत मिळून आपण सत्ता स्थापन करू असे एकनाथ शिंदे यांनी या आमदारांना सांगितले होते. मात्र तसे अजूनही घडता दिसत नाही. आज सहावा दिवस आहे, हे आमदार राज्यातून बाहेर आहेत. मात्र अजूनही सत्ता स्थापन करता आलेली नाही. त्यामुळे या आमदारांचा संयम सुटला आहे. वादावादी सुरू झाली आहे, असे सामनाने म्हटले आहे.
दरम्यान राज्याच्या राजकारणात सध्या जो गोंधळ सुरू आहे, तो कधी संपेल याचे निश्चित उत्तर कोणाकडेही नाही. बंडखोरी करताना बंडखोराच्या म्होरक्याने सांगितले होते की, आपला गट हाच शिवसेना असेल. मात्र तसे काही झाले नाही. स्वप्न हे स्वप्नच राहिले. त्यामुळे या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. आता सत्ता स्थापन झाली नाही तर प्रहारसोबत जाऊन बसायचे का असा सवाल हे आमदार विचारत असल्याचे सामनाने म्हटले आहे