मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात मोठी उलथापालथ पहायला मिळाली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेते फूट पडली. शिवसेनेतील (shiv sena) आमदारांच्या एका मोठ्या गटाने एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्यामुळे सरकार अल्पमतात आले. राज्यापालांनी उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करावे यासाठी पत्र पाठवले होते. मात्र बहुमत सिद्ध करण्याआधीच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपाने सत्तास्थापनेचा दावा केला. देवेंद्र फडणवीस हेच आता मुख्यमंत्री होणार असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र इथेही सर्वांना अनअपेक्षीत धक्का बसला आणि बंडखोर आमदारांच्या गटाचे नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. यावरून भाजपमधील अतंर्गत कलह समोर आल्याचे आणि देवेंद्र फडणवीस हे नाराज असल्याची जोरदार चर्चा झाली. आता या सर्व प्रकरणावर शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने फडणवीस नाराज आहेत का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला होता. यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी म्हटले आहे की ते असं नाही सांगता येणार. फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतरच ते नाराज आहेत की नाही हे समोर येऊ शकते असे राऊत यांनी म्हटले आहे. तसेच आता नव्या सरकारकडून जनतेचे प्रश्न सोडवले जातील अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान यावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्रीपद मिळाल्याने एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. सोबतच नवा संसार सुखाने करा म्हणत चिमटा देखील काढला आहे. आम्ही नव्या सरकारच्या कामात कोणताही अडथळा निर्माण करणार नसल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. उद्धव ठकरेंबाबत बोलताना राऊत म्हणाले की, जिथे ठाकरे असतील तिथेच शिवसेना असेल. राऊत यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आल्याने आज राऊत चौकशीसठी ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत.