शिवसेना अन् सत्ता संघर्षावरची सुनावणी पुढे ढकलली, कारण काय? पुढची तारीख काय?
आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर महत्त्वपूर्ण सुनावणी होणार असून एकनाथ शिंदे यांच्या वतीने संजय किशन कौल तर सुभाष देसाई यांच्या वतीने कपील सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी हे ज्येष्ठ वकील बाजू मांडत आहेत.
नवी दिल्लीः महाराष्ट्रातील (Maharashtra) शिंदे-भाजप (Shinde BJP Govt) सरकारचं भवितव्य ठरवणारी सुप्रीम कोर्टातील (Supreme Court) आजची महत्त्वाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी आता पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. घटनापीठातील पाच न्यायमूर्तींपैकी एक न्यायमूर्ती उपलब्ध नसल्याने सुनावणी लांबणीवर पडली. न्यायमूर्ती कृष्ण मुरारी हे आज हजर राहू शकत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सुनावणी करणारे न्यायाधीश कोण?
1. न्यायमूर्तीं धनंजय चंद्रचूड
2.न्यायमूर्तीं एम आर शहा
3.न्यायमूर्तीं कृष्ण मुरारी
4.न्यायमूर्तीं हिमाकोहली
5. न्यायमूर्तीं पीएस नरसिंहा
16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्याबाबत सुप्रीम कोर्टात सुभाष देसाई यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील ही सुनावणी आता पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टीस धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय घटनात्मक पीठापुढे ही सुनावणी होत आहे. मागील सुनावणीत सर्व पक्षकारांना लेखी म्हणणे मांडण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले होते. त्यानुसार ठाकरे गट , शिंदे गट आपली बाजू मांडणार आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या गटाने निवडणूक आयोगाकडील प्रक्रिया सुरू ठेवण्याबाबत सुप्रीम कोर्टाकडे विनंती केली होती. त्यानुसार 27 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत कोर्टानं निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर महत्त्वपूर्ण सुनावणी होणार असून एकनाथ शिंदे यांच्या वतीने संजय किशन कौल तर सुभाष देसाई यांच्या वतीने कपील सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी हे ज्येष्ठ वकील बाजू मांडत आहेत. तर केंद्र सरकारच्या वतीने महाधिवक्ते तुषार मेहता बाजू मांडण्याची शक्यता आहे.